दरवर्षी नव्या उच्चांकाची नोंद; वायुप्रदूषण, जंगलतोड तापमानवाढीसाठी कारणीभूत
जागतिक पातळीवरील तापमानात महाराष्ट्रातील चंद्रपूर हे शहर सर्वोच्च स्थानी पोहोचले आणि पुन्हा एकदा तापमानवाढीवर चर्चा सुरू झाली. मात्र नासाच्या आंतरराष्ट्रीय हवामान बदलावरील अभ्यासानुसार पृथ्वीचे सरासरी तापमान हे २०१० पासून सातत्याने वाढतच आहे. विशेष म्हणजे दरवर्षी तापमानवाढीचा विक्रम मोडला जात आहे. वायुप्रदूषण, जंगलतोड यासह उन्हाळ्यातील वाढत्या तापमानाला गुजरात, राजस्थान येथून येणारे उष्ण वारेदेखील तेवढेच कारणीभूत ठरत आहेत.
गेल्या शंभर वर्षांत २००५, २००७, १९७३, १९८९, १९९६, १८९२ या वर्षांत उष्णतेची लाट आल्यामुळे तापमानात प्रचंड वाढ झाली होती. तर गेल्या ५० वर्षांच्या आकडेवारीवर दृष्टिक्षेप टाकला तर २००० सालच्या आधी आणि नंतर अधूनमधून तापमान वाढत होते. मात्र २०१० पासून तर आता २०१८ पर्यंत महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशातच बहुतेक ठिकाणी तापमान वाढलेले दिसत आहे. उष्णतेच्या लहरी त्यासाठी कारणीभूत आहेत आणि या लहरी निर्माण होण्यासाठी जंगलतोड आणि प्रदूषण कारणीभूत आहे. वायुप्रदूषणाचा सर्वाधिक परिणाम होत आहे. हरितगृह वायू शोषून घेण्याचे काम जंगल करतात, पण जंगलच नसेल तर हा वायू हवेतच राहतो. हळूहळू त्याचे आवरण तयार होते आणि तापमानात आणखी वाढ होते. निसर्गनियमानुसार रात्री तापमान कमी व्हायला हवे, पण अलीकडच्या काळात रात्रीचे तापमानसुद्धा वाढत आहे. दिवसापेक्षाही रात्रीच्या तापमानाचा आकडा गांभीर्याची स्थिती दर्शवणारा आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा यांच्या दिवस आणि रात्रीच्या तापमानात बदल होत आहेत. थंडीचे दिवस कमी आणि उष्णतेचे दिवस वाढले आहेत. जागतिक पातळीवरच हा बदल घडून येत आहे. गुजरात, राजस्थानमधून जोपर्यंत वारे येत नाहीत, तोपर्यंत तापमान वाढत नाही. उन्हाळ्यात अधिकाधिक दिवस तिकडूनच वारे येतात. विशेषकरून विदर्भात गुजरात, राजस्थानमधून वारे आले आणि एप्रिल महिन्यातच तापमान प्रचंड वाढले. पाकिस्तान, अरब देशाकडून येणारे वारे गुजरात, राजस्थानकडे आल्यानंतर गरम होतात आणि मग महाराष्ट्रात गरम वारे वाहतात. हवामान खात्याने अलीकडेच वाऱ्याची दिशा बदलू शकते आणि पुन्हा एकदा थंड हवा येऊ शकते, असा एक अंदाज व्यक्त केला आहे. हे थंड आणि गरम वारे एकत्र झाले तर वादळी स्थिती निर्माण होऊ शकते.
चंद्रपूर शहराचे तापमान जागतिक पातळीवर सर्वाधिक नोंदवले गेले आहे. मात्र यात अनेक घटक कारणीभूत आहेत. शहराच्या सभोवताला वीजनिर्मिती केंद्र आणि इतर कारखाने आहेत. शहरात वृक्षराजी अतिशय कमी आहे आणि तिसरे कारण म्हणजे सिमेंटची घरे. सिमेंट-काँक्रीटची घरे बाहेर उष्णता फेकतात. ही उष्णता तापमानाच्या वाढीस कारणीभूत ठरते आणि तापमान मोजले जाते तेव्हा त्यात या उष्णतेचा देखील अंतर्भाव असतो. स्थानिक पातळीवर त्या त्या ठिकाणच्या परिस्थितीनुसार तापमान कमीअधिक होत असते.
तापमान ४७ अंश सेल्सिअसपर्यंत – प्रा. चोपणे
जंगल नसल्यामुळे सूर्याची किरणे थेट जमिनीवर पडतात. त्यामुळे तापमानात वाढ होते. यावर्षी सूर्य पृथ्वीच्या जवळ येण्याआधीच तापमान वाढले आहे. या आठवडय़ात काही ठिकाणी तापमान कमी होईलही, पण पुन्हा वाऱ्याची दिशा बदलली की तापमान पुन्हा वाढेल. एप्रिलचे सरासरी तापमान ४५ अंश सेल्सिअस असते. तर मे महिन्याची तापमानाची सरासरी ही ४६ अंश सेल्सिअस असते. यावर्षी साधारणपणे ४७ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान जाईल, असा अंदाज हवामान अभ्यासक व ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी व्यक्त केला.
एप्रिलमधील सर्वाधिक तापमानाच्या नोंदी
एप्रिल महिन्यात २० शहरांमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. हे तापमान ४५ ते ४७ अंश सेल्सिअस इतके होते. जळगाव येथे २६ एप्रिल १९७० मध्ये ४७.२, अकोला येथे ३० एप्रिल २००९ला ४७ तर अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, नागपूर, पुसद, वर्धा, सिरोंचा, जेऊर येथे ४६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती.
तापमानात आघाडीवर असणारी शहरे
महाराष्ट्रात चंद्रपूर, ब्रह्मपुरी, सिरोंचा, भिरा, अकोला, अमरावती, जळगाव, नागपूर, नांदेड, नंदूरबार, पुसद, परभणी, वर्धा, यवतमाळ, मालेगाव, बीड, बारामती, सोलापूर, उस्मानाबाद ही शहरे उन्हाळ्यातील तापमानात आघाडीवर राहिली आहे.