नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे प्रमुख उपस्थितीत राज्यांतर्गत तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ विकास विषयक आराखड्यांना मान्यता देण्यासाठी गुरूवारी मुंबईत राज्यस्तरीय शिखर समितीची बैठक पार पडली. या बैठकीत आमदार कृष्णा खोपडे यांना विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निमंत्रित करण्यात आले होते.
शिखर समितीच्या बैठकीत पूर्व नागपूरातील ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र असलेले प्रसिद्ध देवस्थाने ज्यात शांतीनगर येथील कुत्तेवाले बाबा आश्रम, पारडी येथील पुरातन मुरलीधर मंदिर, नंदनवन येथील लक्ष्मीनारायण शिव मंदिर (५१ फुट) या सर्व तिर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यांना विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली.
आमदार कृष्णा खोपडे यांनी सांगितले की, पूर्व नागपुरातील कुत्तेवाले बाबा आश्रम, पुरातन मुरलीधर मंदिर, लक्ष्मीनारायण शिव मंदिर (५१ फुट) या प्रसिद्ध देवस्थानाला जिल्हाधिकारी, नागपूर यांनी शासन आदेशानुसार क- वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता दिलेली आहे. त्यामुळे या क-वर्ग तीर्थक्षेत्राचे विकास आराखडे विकास आराखडे महापालिकेने तयार करून राज्य शासनाकडे मान्यतेसाठी पाठविले होते.
गुरुवारी मुख्यमंत्री फडणवीस यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत या सर्व विकास आराखड्याला मान्यता देण्यात आली. हा पहिला टप्पा म्हणून मान्यता देण्यात येत असून आवश्यकता असल्यास पुन्हा निधी देणार असल्याचे मुख्यमंत्री महोदयांनी बैठकीत सांगितले. त्यामुळे येत्या काळात या तिन्ही तीर्थक्षेत्राचे वेगळे स्वरूप आपल्याला बघायला मिळेल, अशी अपेक्षा आमदार कृष्णा खोपडे यांनी व्यक्त केली.