पुणे, नागपूर, मुंबई : देशातील राज्यांच्या आर्थिक आलेखात अव्वल असलेल्या महाराष्ट्राची आर्थिक आघाडीवर घसरण होत असल्याचे पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेकडून दिलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. या मुद्यांवरून विरोधकांना राज्य सरकारला लक्ष्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही सरकारवर टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेकडून दिलेल्या अहवालात राष्ट्रीय पातळीवरील सकल उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा दोन टक्क्यांनी घटला आहे. या मुद्यांवर सरकारला धारेवर धरताना शनिवारी गोविंदबागेतील पत्रकार परिषदेत शरद पवारांनी लक्ष्य केले. शरद पवार म्हणाले की, विधानसभा निवडणूक संपल्यानंतर एक-दोन महिन्यांमध्ये राज्याची खरी आर्थिक स्थिती समोर येईल. सध्या राज्यातील सत्ताधाऱ्यांनी काही नवीन योजनांसाठी गरिबांसाठी असणाऱ्या योजनांचा निधी वळवला आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून गरिबांच्या पदरात काहीही पडलेले नाही. केंद्र सरकार अर्थखात्याशी संबंधित एका विभागाने देशातील राज्यांच्या आर्थिक कामगिरीचे रँकिंग जाहीर केले आहे. जे राज्य एकेकाळी पहिल्या क्रमांकावर होते, ते पहिल्या पाचमध्ये नाही. याशिवाय, उत्पन्न आणि दरडोई उत्पन्नासंदर्भातही महाराष्ट्रासाठी धक्कादायक परिस्थिती आहे, असा दावा शरद पवारांनी केला. पंतप्रधानांसोबत काम करणाऱ्या लोकांनी तयार केलेल्या अहवालाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

हेही वाचा >>>यवतमाळ : काळी दिवाळी अन शिदोरी…, काय आहे नेमके प्रकरण जाणून घ्या

अर्थव्यवस्था मजबूत करायला जी काही पावले टाकली पाहिजेत त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. नुसते राजकारण करून प्रश्न सुटत नाहीत. तर सध्या परिस्थिती किती गंभीर आहे, हे याकडे लक्ष दिले पाहिजे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.  विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्राच्या आर्थिक घरसणीवर टीका केली. महाराष्ट्राची अधोगती होत आहे. हे आम्ही सातत्याने सांगत होतो. भाजप आणि सरकार आम्हाला खोटे ठरवत होते. मात्र आता पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालातून महाराष्ट्राची आर्थिक घसरण झाल्याचे स्पष्ट केले आहे. महाराष्ट्राची स्थापना झाल्यापासून महाराष्ट्र क्रमांक एकवर होता. मात्र मागील १० वर्षांत विविध क्षेत्रात महाराष्ट्राची पिछेहाट झाली आहे. जीडीपीमध्ये प्रचंड घट झाली असून आता १५.२ टक्के वरून १३ वर आला आहे. तेलंगणा, गुजरात, कर्नाटक, हरियाणा, तामिळनाडू, पंजाब ही राज्ये आपल्यापुढे गेले आहे. या जोडतोड सरकारने महाराष्ट्राची आर्थिक अधोगती केली आहे. देशाच्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये महाराष्ट्र ११ व्या स्थानावर आहे, अशी जोरदार टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

आघाडीच्या काळात जीडीपी कमी, आता १३.३ टक्के – शेलार

भाजप नेते आशीष शेलार  राज्य सरकारची बाजू मांडताना म्हणाले, आघाडीच्या काळात जीडीपी कमी होता. आम्ही तो २०२१ पर्यंत १३ टक्क्यांवर आणला आणि २०२३ मध्ये तो १३.३ टक्के झाला. चढती कमान आता महायुती सरकारच्या काळात पुन्हा सुरू झाली आहे. ज्या गुजरातचा उल्लेख केला जातो तो आजही ८ टक्क्यांवर आहे. महाराष्ट्र त्यापेक्षा कितीतरी पुढे आहे आणि पुढेच राहील, असा दावाही शेलार यांनी केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Economic decline state government sharad pawar vijay wadettiwar criticize the government amy