यवतमाळ: देशात २०१६ एका बेसावध क्षणी नोटबंदी जाहीर करण्यात आली. या ‘नोटीबंदी’च्या यशापयशावर आजही चर्चा घडत आहे. नोटबंदीच्या निर्णय प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावलेले अर्थतज्ज्ञ अनिल बोकील यांनी मात्र देशात नोटबंदी यशस्वी झाल्याचा दावा केला आहे.
राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रम व अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त येथील बचत भवनात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोला जिल्हा ग्राहक मंचचे अध्यक्ष सुहास आळसी होते. यावेळी जयंती समितीचे विदर्भ अध्यक्ष अजय मुंधडा, अ.भा.ग्राहक पंचायतीचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष डॉ.नारायण मेहरे, सचिव नितीन काकडे, संघटन मंत्री अजय गाडे आदी उपस्थित होते.
हेही वाचा… ‘फेसबुक फ्रेंड’चे महिलेशी अश्लील चाळे, एकतर्फी प्रेमातून विनयभंग
भारतात नोटाबंदीनंतर बोटे उचलली जात होती. मात्र करप्शन परफेक्शन इंडेक्समधून नोटाबंदी यशस्वी झाली, हे समजते, असे बोकील यावेळी बोलताना म्हणाले. दोन हजार रुपयांची नोट छापण्यासाठी केवळ ३.५९ पैसे खर्च येतो. भारतातील एकशे चाळीस कोटी लोकसंख्येत एक टक्के लोकांकडे ४० टक्के संपत्ती आहे. १० टक्के लोकांकडे ७२टक्के संपत्ती आहे. तर शेवटच्या ५० टक्के लोकांकडे केवळ तीन टक्के संपत्ती असल्याचे बोकील म्हणाले. ६० वर्षांवरील सर्व नागरिकांना देशाची संपत्ती मानण्यासाठी मसुदा तयार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. याची अंमलबजावणी झाल्यास ज्येष्ठ नागरिकांना चांगली पेन्शन मिळून कुटुंबात त्यांची काळजी घेणाऱ्यांची संख्या वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादापासून एक पाऊल पुढे टाकले तर तो मानवतावाद आहे. मानवतावादाने सर्व संघर्ष टाळता येतात. देशात विवेकबुद्धीने काम करण्याची गरज आहे, असेही बोकील म्हणाले. कार्यक्रमात उपस्थितांनी ग्राहक संरक्षणाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. संचालन मतीन खान यांनी केले तर आभार अनुपमा दाते यांनी मानले.