नागपूर : भाजप सरकार काँग्रेस नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल करत आहेत. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी व लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यावर राजकीय सुडबुद्धीने अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वीही ईडीने सोनिया व राहुल गांधी यांची चौकशी केली आहे. अशाप्रकारे काँग्रेस नेत्यांना नाहक त्रास दिला जात आहे, असा आरोप काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला.
काँग्रेसने दंगलग्रस्त नागपुरात आज काँग्रेसने सद्भावना शांती मार्च काढला. यावेळी ते बोलत होते.ते म्हणाले, भाजपा सरकारच्या विरोधात निर्भिडपणे उभे राहणाऱ्या काँग्रेसच्या देशभरातील नेत्यांवर मोदी सरकार कारवाई करत आहे. काँग्रेस पक्ष ईडी, सीबीआयच्या कारवायांना घाबरत नाही. काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता एकजूट होऊन या कारवाईचा निषेध करेल. जाती धर्माच्या नावावर सुरु असलेला भेदभाव थाबंवण्यासाठी काँग्रेसने सदभावना यात्रा काढली असून अशा सदभावना यात्रा राज्यभर काढल्या गेल्या पाहिजे.
भाजपा जाती धर्माच्या नावाखाली भेदभाव करत आहे. नागपुरात सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने नांदत असताना या शहरात हिंसाचार झाला त्याला जबाबदार कोण? मुख्यमंत्री आणि गृहमंत्री नागपूरचे आहेत तरीही त्यांना या घटनेची माहिती कशी मिळाली नाही? गुप्तचर विभागाने त्यांना माहिती दिली होती काय आणि घटनेपूर्वी माहिती मिळाल्यानंतर काय केले. आणि जर दंगलीची चाहुलच लागली नसेल तर हे गुप्तचर विभागाचे अपयश आहे. सरकारने निष्पक्षपणे घटनेची चौकशी करून दोषींना शिक्षा करणे अपेक्षित आहे. पण, सरकार दंगखोऱ्यांना मदत करत असल्याचे चित्र आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध घालून दिल्यावर सुद्धा आरोपीच्या घरावर बुलडोझर कसे काय चालवण्यात आले, असा प्रश्नही रमेश चेन्नीथला उपस्थित केला.
नागपूरची दंगल दिल्लीतून प्रायोजित
महाराष्ट्रातील जमीन, खनिज संपत्तीची लुट करण्यासाठी आणि महागाई, बरोजगारी रोखण्यात सरकारला आलेल्या अपयशापासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी नागपूरची दंगल घडवण्यात आली. ही दंगल दिल्लीतून प्रायोजित होती, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.सपकाळ यावेळी म्हणाले, नागपुरात झालेल्या हिंसाचारावेळी मुख्यमंत्री पोलिसांना फोन करत होते, पण पोलीस फोन उचलत नव्हते, असे भाजपाचे एक आमदार सांगत होते, यातून दंगलीचे प्रायोजक दिल्लीतून झाले आहे. हे वेगळे सांगण्याची गरज नाही. राज्य टिकण्यासाठी दंगली घडवल्या जात आहेत व या दंगलींच्या आडून महाराष्ट्र लुटला जात आहे. उद्योगपतींना जमिनी दिल्या जात आहेत. आपल्याला एकजुटतेने सद्भावनेच्या मार्गाने जावे लागणार आहे. संविधानाचा, शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन जायचा आहे आणि राहुल गांधी यांचे ‘मोहब्बत की दुकान’ उघडायचे आहे. सत्तेसाठी काही लोक भावाभावात, जातीपातीत भांडणे लावत आहेत. सत्तेसाठी अशांतता पसरवणाऱ्यांनी जाती धर्मात, भावा भावात भांडणे लावू नये, असे आवाहन सपकाळ यांनी केले.