यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या खा. भावना गवळी यांच्या मागे गेल्या वर्षभरापासून सक्तवसुली संचालनालया (ईडी)च्या कारवाईची पीडा लागली आहे. तेव्हापासून खा. भावना गवळी प्रत्यक्ष मतदारसंघातसुद्धा दिसत नाहीत. त्यांच्या मागे लागलेली ईडीची ही पीडा टळो यासाठी शिवसैनिकांकडून आज सोमवारी खा. भावना गवळी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कळंबच्या श्री चिंतामणी मंदिरात गणेशयाग यज्ञ करण्यात आला. या यज्ञात अनेक शिवसैनिक सहभागी झाले होते.
वाशिम येथील कारखाना विक्री व अन्य आर्थिक व्यवहारांसंदर्भात खा. गवळी यांना सक्तवसुली संचालनालयाने सध्या घेरले आहे. गेल्या वर्षभरापासून त्यांच्यामागे कारवाईचा ससेमिरा सुरू आहे. सातत्याने ईडीच्या नोटीसा येत असल्याने त्याचा परिणाम खा. गवळी यांच्या राजकीय प्रवासावरही झाला आहे. खा. गवळी पूर्वीप्रमाणे जनमानसात दिसत नसल्याने मतदार आणि शिवसैनिकही अस्वस्थ आहेत. खासदारच भेटत नसल्याने जनतेने आपल्या व्यथा कोणापुढे मांडाव्या, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाकडून डावलल्या जात असल्याची खा. भावना गवळी समर्थकांची धारणा झाली आहे. पक्षप्रमुख व शिवसेनेतील इतर नेतेही या अडचणीच्या काळात ताईंसोबत नसल्याची खंत अनेक शिवसैनिक व्यकत् करत आहेत. त्यामुळे आता यज्ञ, याग करूनच ताईंना ईडीच्या पीडेतून सुटका मिळेल, या भावनेतून शिवसैनिकांनी आज सोमवारी कळंब येथील प्रसिद्ध श्री चिंतामणी मंदिरात गणेशयाग यज्ञ केला. भावनाताईंवर आलेल्या या संकटातून त्यांची सहिसलामत सुटका करून त्यांना जनतेच्या प्रश्नांसाठी लढण्याचे बळ मिळो, अशी प्रार्थना शिवसैनिकांनी यावेळी केली.
संग्रहित लेख, दिनांक 23rd May 2022 रोजी प्रकाशित
खा. भावना गवळींच्या मागे लागलेली ईडीची पीडा टळो ! ; शिवसैनिकांचा चिंतामणी मंदिरात गणेशयाग यज्ञ
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या खा. भावना गवळी यांच्या मागे गेल्या वर्षभरा
Written by लोकसत्ता टीम

First published on: 23-05-2022 at 19:23 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ed behind the emotions ganesha sacrifice at chintamani temple shivsena amy