नागपूरमधील वकील सतीश उके यांच्या घरावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी छापा टाकला. या प्रकरणावरुन आता राज्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरु झालेलं असतानाच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये या प्रकरणावर भाष्य केलंय. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी या प्रकरणासंदर्भात काल पत्रकार परिषदेमध्ये बोलताना, एक प्रकारे देशात अघोषित आणीबाणी लागू करण्यात आहे असं वक्तव्य केलेलं.

नक्की वाचा >> “ग्लिसरीनची बॉटल घेऊन सगळे पवार लाईनमध्ये उभे होते; शरद पवार पण रडत होते, कधी सुप्रिया सुळे…”

फडणवीस यांना नागपूर विमानतळावर पत्रकारांनी उके प्रकरणासंदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी यासंदर्भात सविस्तर भूमिका मांडली. “मला या प्रकरणाची काही कल्पना नाही, मी देखील माध्यमांमध्येच बघितलं आहे की, एका जमीनीच्या प्रकरणामध्ये नागपूरच्या पोलिसांनी त्यांच्याविरोधात एक गुन्हा दाखल केलेला. त्या तक्रारीवर ईडीने त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. मूळ तक्रार, मूळ कारवाई आहे ती महाराष्ट्र पोलिसांची आहे, नागपूर पोलिसांची आहे. त्यावर आधारितच कारवाई ईडीने केलीय,” असं फडणवीस म्हणाले.

पुढे बोलताना फडणवीस यांनी उके यांच्यासंदर्भातील आधीच्या प्रकरणांचा उल्लेख केला. “सगळ्यात महत्वाची गोष्ट ही की त्यांच्याविरोधात २००५ पासून वेगवगेळे एफआयआर आहेत. वेगवेगळ्या न्यायाधिशांची खोटी तक्रार केल्याबद्दल त्यांच्याविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात झाला. त्यांनी त्यांना शिक्षा केली. सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर सर्वोच्च न्यायालयाने ती शिक्षा का वाढवण्यात येऊ नये अशाप्रकारचा निर्णय दिलीय. आता सर्वोच्च न्यायालयात ते प्रलंबित आहे. त्यांना न्यायाधिशांची खोटी तक्रार केल्याप्रकरणीही शिक्षा झालेली आहे,” असं फडणवीस म्हणाले. विशेष म्हणजे सतीश उके यांनी फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक याचिका दाखल केली होती. त्यामुळे ते अधिक चर्चेत आले होते.

नक्की वाचा >> महाविकास आघाडीतील ‘या’ दोन मंत्र्यांविरोधातील तक्रार मोदी सरकारने स्वीकारली; सोमय्या म्हणाले, “आजपासून…”

तसेच, “मला असं वाटतं की जे काही कायदेशीर आहे ते कायद्याने या ठिकाणी होईल, तेच ईडी करतेय,” असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. फडणवीस आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आज एकाच विमानाने नागपूरमध्ये दाखल झाले. या प्रवासामध्ये दोघांमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाल्याची माहिती सुत्रांच्या हवाल्याने समोर आलीय.

बेकायदा दूरध्वनी टॅपिंगप्रकरणी आपण आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात ५०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. अ‍ॅड्. सतीश उके हे या प्रकरणातील आमचे वकील आहेत. परंतु अचानक त्यांच्या घरावर ईडीने छापा टाकून फाइली, लॅपटॉप, मोबाइल जप्त केले आहेत. उके हे न्यायमूर्ती लोया यांच्या संशयास्पद मृत्यूसह इतर प्रकरणावरही काम करत आहेत. त्यांचा आवाज दडपण्यासाठीच ही कारवाई केली आहे. हा एकटय़ा उके यांचा प्रश्न नसून भाजप सरकारच्या विरोधात कोणीही आवाज उठवला तरी त्यांचा आवाज दडपण्यासाठी ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणांमार्फत खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत, असं पटोले यांनी कालच उके प्रकरणाबद्दल बोलताना म्हटलं होतं.

Story img Loader