लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अकोला: मेसर्स नारायण एक्सपोर्ट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने तीन बँकांची १०९.८७ कोटींनी फसवणूक केली. कर्ज ज्या कारणासाठी घेतले त्यावर खर्च केले नाही. शिवाय कर्जाची परतफेड देखील केली नसल्याने या प्रकरणी भोपाळ येथे कंपनीच्या संचालकांविरोधात गुन्हे दाखल झाले. या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) महाराष्ट्रातील अकोला, मध्य प्रदेशातील इंदोर, जौरा, मंदसौर आदींसह एकूण ११ ठिकाणी छापेमारी केली. छापेमारी दरम्यान संशयास्पद व्यवहारांची कागदपत्रे, स्थावर मालमत्ता ईडीच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली. ३१ जानेवारी रोजी अधिकाऱ्यांनी ही कारवाई केल्याचे ईडीकडून स्पष्ट करण्यात आले.

२०११ ते २०१३ च्या दोन वर्षांमध्ये नारायण एक्सपोर्ट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, भोपळच्या संचालकांनी यूको बँक, कॉर्पोरेशन बँक व पंजाब नॅशनल बँक या तीन बँकांकडून क्रेडिट सुविधेचा लाभ घेऊन ११० कोटी ५० लाख रुपयांची उचल केली होती. त्यातील १०९.८७ करोड रुपयांचे कर्ज परतफेड केले नाही. कंपनीने ज्या कारणांसाठी कर्ज घेतले, त्यासाठी त्याचा वापर केला नाही. कर्जाच्या रकमेचा बनावट हिशेब बँकांना सादर केला होता. याप्रकरणी सर्वप्रथम सीबीआयने भोपाळमध्ये गुन्हा दाखल करून तपास केला. आरोपपत्र देखील दाखल केला. कंपनीच्या व्यवहारातील आर्थिक गुंतागुंत उजेडात आल्यानंतर ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. मेसर्स नारायण एक्सपोर्ट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि कंपनीच्या समूह कंपन्यांची कार्यालये, संचालक मंडळांच्या निवासस्थानांवर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. या प्रकरणी ईडीकडून तपास केला जात आहे.

आणखी वाचा-नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात टी-१ वाघीण सह दोन बछड्यांचे दर्शन

इतर चार कंपन्यांकडे कर्जाची रक्कम वळवली

कर्जाच्या माध्यमातून मिळालेली रक्कम कंपनीने समूहातील पद्मावती ट्रेडिंग कंपनी, मंदसौर सेल्स कॉर्पोरेशन, रामकृष्ण सॉल्वॅक्स प्रायव्हेट लिमिटेड आणि धौलतवाला एक्जिम प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांना कुठल्याही मालाची देवाण-घेवाण केली नसतांना वळती केल्याचे तपासात दिसून आले. या कर्जासाठी तारण म्हणून जी मालमत्ता कंपनीने बँकांकडे ठेवली होती ती मालमत्ता देखील कंपनीने परस्पर विकून टाकल्याचे तपासात समोर आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ed raids at 11 places in madhya pradesh including akola ppd 88 mrj
Show comments