चंद्रपूर:ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात ऑनलाइन बुकिंगच्या नावाखाली १२ कोटींहून अधिक रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी मुख्य आरोपी रोहित व अभिषेक बबलू ठाकूर यांच्या सरकारनगर येथील बंगल्यावर तसेच सर्व प्रतिष्ठानवर एकाचवेळी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पथकाने बुधवारी पहाटे चार वाजता छापे टाकल्याने खळबळ उडाली. विशेष म्हणजे, यावेळी ठाकूर बंधू बाहेरगावी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हेही वाचा >>> राज्यावर पुन्हा अवकाळीचे संकट! ; हवामान खाते…
जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी प्रकल्पात ऑनलाईन तिकीट विक्रीत १२ कोटीपेक्षा अधिकचा घोटाळा झाल्याचे ताडोबा प्रकल्पाचे संचालक तथा मुख्य वन संरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी उघडकीस आणले होते. या प्रकरणी डॉ. रामगावकर यांच्या तक्रारीवरून. रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे. दरम्यान, नंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. तिथे न्यायालयाने ठाकूर बंधू यांना पैसे जमा करण्यास सांगितले होते. तेव्हा ठाकूर यांनी २ कोटी ४१ लाख रुपये जमा केले आहेत.
हेही वाचा >>> नागपुरात दोन मुलांना ‘एचएमपीव्ही’? गडचिरोलीत चार संशयित रुग्ण, नमुने तपासणीसाठी ‘एम्स’मध्ये
१२ ऑक्टोबरपर्यंत ३ कोटी रुपये जमा करण्याची परवानगी मिळावी यासाठी त्यांनी नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ठाकूर बंधूंनी उर्वरित ३ कोटी रुपये जमा करण्यासाठी पुन्हा मुदत मागितली होती. दरम्यान हे प्रकरण सुरू असतानाच सक्त वसुली संचालयाने बुधवारी पहाटे ठाकूर बंधू यांच्या सरकारनगर येथील निवासस्थानी तसेच स्वाद हॉटेल, पेट्रोल पंप व बेकरी तसेच इतर प्रतिष्ठान येथे छापे टाकले. कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. नागपूर येथून पाच ते सहा इनोव्हा गाडीत हे पथक येथे दाखल झाले असून २५ अधिकाऱ्यांची टीम असल्याचे सांगण्यात येत आहे.
या घोटाळ्याची तक्रार डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी स्वतः सक्तवसुली संचालनालयाकडे केली होती. तसेच स्वतंत्र चौकशी करावी अशीही मागणी केली होती. त्यानंतर या प्रकरणाकडे संपूर्ण वन खात्याचे लक्ष लागले होते. ईडी केव्हाही चौकशीसाठी येणार, अशी चर्चा सुरू असतानाच बुधवारी ईडी अधिकाऱ्यांचे पथक चंद्रपुरात धडकले. या चोकशीमुळे पुन्हा एकदा ताडोबा प्रकल्पातील बुकींग घोटाळा चर्चेत आला आहे.