चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील १२ कोटी १५ लाख ५० हजार रुपयांच्या ऑनलाईन तिकीट घोटाळ्याची चौकशी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) या केंद्रीय तपास यंत्रणेने सुरू केल्याने वन विभागात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या घोटाळ्यातील मुख्य आरोपी अभिषेक विनोदसिंह ठाकूर व रोहित विनोदसिंह ठाकूर या दोघांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती. आता ईडीने तपास सुरू केल्याने ठाकूर बंधूंच्या अडचणीत वाढ झाली आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ऑनलाईन तिकीटचे काम चंद्रपूर वाईल्ड लाईफ कनेक्टीविटी सोल्युशन या अभिषेक विनोदसिंह ठाकूर व रोहित विनोदसिंह ठाकूर यांच्याकडे होते. या दोघांनी मिळून ऑनलाईन तिकीट विक्रीत १२ कोटी १५ लाख ५० हजारांचा गैरव्यवहार केला. या आर्थिक गुन्ह्याच्या प्रकरणात ठाकूर बंधूंना अटक झाली. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांना या आर्थिक गुन्ह्याची पाळेमुळे अधिक खोलवर असल्याची शंका आली. त्यामुळे डॉ. रामगावकर यांनी ईडीकडे या गुन्ह्याचा तपास करण्याची विनंती केली. डॉ. रामगावकर यांच्या विनंतीनंतर ईडीने तपास सुरू केला आहे.
हेही वाचा – साताऱ्याच्या विकासाचं माझ्यावर सोडा, तुम्ही फक्त उदयनराजेंना निवडून द्या : अजित पवार
हेही वाचा – राज ठाकरे सकाळी किती वाजता उठतात? दुपारी उठण्याच्या टीकेवर उत्तर; म्हणाले, “मी रोज… “
या प्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताडोबा व्यवस्थापनाकडून लेखा परीक्षणाची सर्व कागदपत्रे मागवून घेतली आहेत. गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी संतोष म्हस्के यांच्याकडूनही प्रकरणाची सर्व कागदपत्रे मागविली आहेत. या प्रकरणात मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण घेवाण झाली आहे. त्यामुळेच ईडीने सविस्तर तपास सुरू केला आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, तपास करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाला विनंती केली होती. त्यानुसार तपास सुरू झाला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणातील मुख्य आरोपी अभिषेक व रोहित ठाकूर बंधू जवळपास एक ते दीड महिना फरार होते. स्थानिक न्यायालयाने ठाकूर बंधूंना काही रक्कम जमा करण्याचे निर्देश दिले होते. त्यांनी काही रक्कम जमाही केली होती. मात्र या घोटाळ्याची पाळेमुळे अधिक खोलवर रुजल्याने उच्च न्यायालयाने या दोघांचा जामीन रद्द केला होता. त्यानंतर सर्वाेच्च न्यायालयानेही जामीन रद्द केला. जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या नेतृत्वात अभिषेक व रोहित ठाकूर यांना एप्रिल महिन्यात अटक करण्यात आली. त्यानंतर या दोघांना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता १२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली होती. त्यानंतर ठाकूर बंधूंची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती. आता या घोटाळ्याचा तपास अंमलबजावणी संचालनालयाने सुरू केल्याने अभिषेक व रोहित ठाकूर यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.