डॉ. आशा सावदेकर यांना साहित्यिकांची श्रद्धांजली

नागपूर : विदर्भ साहित्य  संघाच्या ‘युगवाणी’ या मुखपत्राच्या प्रमुख संपादक, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यपीठाच्या मराठी विभागातील माजी प्रपाठक, मराठी कवितेच्या साक्षेपी अभ्यासक, समीक्षक,

ललित लेखक डॉ. आशा सावदेकर यांच्या निधनाने साहित्य क्षेत्रातील व्यासंगी आणि अभ्यासक समीक्षक काळाच्या पडद्याआड गेली आहे, अशा भावना व्यक्त करत साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. महाराष्ट्र महत्त्वाच्या समीक्षिकेला मुकला विदर्भ साहित्य संघाच्या ‘युगवाणी’ या मुखपत्राच्या प्रमुख संपादक राहिलेल्या व मराठी कवितेच्या साक्षेपी अभ्यासक, समीक्षक, ललित लेखक आणि माझ्या एक आत्मीय डॉ. आशा सावदेकर यांच्या निधनाने अतिशय वाईट वाटले. त्यांच्यासोबतच मीही तेव्हा युगवाणीचा संपादक म्हणून काम केले आहे. या संपूर्ण कुटुंबाच्या जुन्या आत्मीय स्नेह््यांपैकी मीही एक आहे. आशा सावदेकर आणि मी तत्कालीन नागपूर विद्यापीठाच्या सेवेत एकाचवेळी रूजू झालो होतो. तिथल्या संघर्षाचे व आपत्तींचे दिवस यांचा आम्ही एकत्रच सामना केला होता. ‘सरस्वती सन्मान’ प्रदान करणाऱ्या अंतिम निवड  समितीतही त्या राहिल्या होत्या. त्यांच्या निधनाने विदर्भ, महाराष्ट्र एका महत्त्वाच्या समीक्षकाला मुकला आहे. -श्रीपाद भालचंद्र जोशी, महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी

केवळ मैत्रीण नव्हती

आशा सावदेकर केवळ मैत्रीण नव्हती तर आमच्या कुटुंबाशी त्यांचा स्नेह होता. आशाचे पुस्तक प्रकाशित झाले की ती मला देत होती आणि माझे पुस्तक प्रकाशित झाले की मी तिला देत होती. तिचा अभ्यासयुक्त  व्यासंग होता. माझ्या अनेक कथांवर तिने समीक्षणात्मक लेखन केले आहे. तिच्यामध्ये संशोधनात्मक वृत्ती होती. माझी मुले परदेशातून आली की ती कुटुंबातील सदस्य म्हणून भेटायला येत होती. तिला शेवटी विस्मरण आले असले तरी मला मात्र ती ओळखत होती, इतकी आमची घट्ट मैत्री होती. तिच्या निधनाने अभ्यासू समीक्षक आणि चांगली मैत्रीण आमच्यातून गेली. – आशा बगे, ज्येष्ठ साहित्यिक

विद्यार्थीप्रिय प्राध्यापिका

डॉ. आशा सावदेकर यांची ओळख  महाराष्ट्राला साहित्याच्या मर्मग्राही रसज्ञ समीक्षक आणि विद्यापीठातील मराठीच्या विद्यार्थीप्रिय प्राध्यापिका अशी दुहेरी आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एकाचवेळी ऋजुता आणि मनस्वीपणा होता. सावदेकरांनी आयुष्यभर आधुनिक मराठी कवितेच्या अभ्यासाचा ध्यास घेतला होता. त्यातही  विदर्भातील जुन्या कवींची त्यांनी केलेली पुनर्मांडणी महत्त्वाची आहे. हे त्यांचे महत्त्वाचे योगदान सांगता येईल. ‘युगवाणी’ या मासिकांत आमच्यासारख्या नवागतांना त्यांनी त्यात जाणीवपूर्वक स्थान स्थान दिले होते, ही गोष्टही मला फार महत्त्वाची वाटते. – डॉ. प्रमोद मुनघाटे, विभाग प्रमुख स्नोतकोत्तर मराठी विभाग, नागपूर विद्यापीठ

निर्भीड अन् तटस्थ व्यक्तिमत्त्व

डॉ. आशा सावदेकर या मराठी समीक्षा व्यवहारातील एक  दमदार नाव होते. त्यांनी आधुनिक आणि नवसाहित्याची उपयोगिता तसेच आस्वाद समीक्षा मोठ्या प्रमाणात लिहिली. कविता हा त्यांच्या आवडीचा अभ्यासविषय होता. पण त्यासोबतच अन्य साहित्यप्रकारावरही समीक्षा लिहून त्यांनी आपला ठसा स्वतंत्र  उमटलेला आहे. समीक्षेच्या क्षेत्रात आवश्यक असणारा निर्भीडपणा आणि तटस्थपणा  त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. त्यामुळे त्यांच्या समीक्षालेखनातही आवश्यक तो तटस्थपणा आणि त्यासोबतच आस्वादात्मकता आलेली दिसते. त्यांचे असे जाणे मनाला वेदना देणारे आहे. – डॉ. रवींद्र शोभणे, कार्याध्यक्ष, विदर्भ साहित्य संघ.

युगवाणीला दर्जेदार केले

साहित्य क्षेत्रात समीक्षक म्हणून जो वेगळा ठसा उमटवला त्यात कुसुमावती देशपांडे, उषा देशमुख यांच्यानंतर आशा सावदेकर यांचे नाव घेतले जाईल. विदर्भ साहित्य संघाशी त्यांचे नाते जवळचे होते. युगवाणीच्या संपादकपदाची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली होती त्यावेळी त्यांनी अनेक दर्जेदार अंक काढले होते. त्यांनी युगवाणीला दर्जा प्राप्त करून दिला होता. त्यांच्या निधनाने अभ्यासपूर्ण समीक्षक काळाच्या पडद्याआड गेला.  – मनोहर म्हैसाळकर,  अध्यक्ष, विदर्भ साहित्य संघ.