लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यवतमाळ : महागाव तालुक्यातील कोठारी येथील आदर्श विद्यालयात दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मराठी मातृभाषेचा पहिला पेपर फुटला. त्यामुळे शासनाच्या कॉपीमुक्त अभियानाचे अपयश चव्हाट्यावर आले असताना‍ शिक्षण मंडळाने मराठी विषयाची प्रश्नपत्रिका फुटली नाही, असा निर्वाळा देत परीक्षा केंद्राची पाठराखण केली आहे.

दहावी, बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी शासन खबरदारी घेत असताना दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी राज्यात यवतमाळसह जालना येथे पेपर फुटल्याची चर्चा राज्यभर पसरली. महागाव तालुक्यातील कोठारी येथील आदर्श विद्यालयात पेपर सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका व्हाट्सवरून व्हायरल झाली. या संदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणेचे सचिव देविदास कुलाळ यांच्या स्वाक्षरीने शुक्रवारी रात्रीच तातडीने खुलासा जाहीर करण्यात आला. यात, महागाव तालुक्यातील कोठारी येथील परीक्षा केंद्रावर मराठी प्रथम भाषा विषयाची प्रश्नपत्रिका मोबाईलद्वारे व्हायरल झाल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या आहेत. संबंधितांकडून सदर घटनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला असून, या केंद्रावर प्रश्नपत्रिका फुटली नसून गैरमार्ग करण्याच्या दृष्टीने प्रश्नपत्रिका व्हायरल केल्याचे दिसून येते. सदर प्रकरणात दोषी व्यक्तींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे खुलास्यात म्हटले आहे. शिक्षण मंडळाच्या या खुलासा म्हणजे सत्य घटना दडवून संबंधित शिक्षण संस्था आणि तेथील दोषींचा बचाव करण्याचा प्रयत्न असल्याची टीका होत आहे.

या प्रकरणी शिक्षण विस्तार अधिकारी विजय बेतेवाड यांनी शुक्रवारी सायंकाळी महागाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून आदर्श विद्यालय परीक्षा केंद्रावरील संशयित केंद्र संचालक व ज्या मोबाईल क्रमांकारून प्रश्नपत्रिका व्हायरल झाली, त्या अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विस्तार अधिकारी बेतेवाड यांच्या व्हाट्सअपवर आलेल्या प्रश्नपत्रिकेच्या मागील दृश्य हे केंद्र संचालक श्याम कान्होजी तास्के यांच्या कार्यालय परिसरातील असल्याचे आहे. मात्र हा प्रकार आपल्याकडे झाला नसल्याचे केंद्र संचालकांनी सांगितले. परंतु, या केंद्रावर उरलेल्या चार प्रश्नपत्रिकांपैकी एक प्रश्नपत्रिका चुरगाळलेली आढळली. त्यामुळे पेपर येथून फुटल्याचे दिसते, असे तक्रारीत म्हटले आहे.

आदर्श विद्यालय एका आरटीओचे असल्याचे सांगण्यात येते. शिक्षण मंडळाने दिलेल्या खुलास्यात जालना जिल्ह्यात गैरप्रकार घडलेल्या शाळांच्या नावांचा स्पष्ट उल्लेख असताना, महागाव तालुक्यातील शाळेच्या नावाचा उल्लेख का टाळण्यात आला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान या पेपरफुटीमुळे मुख्यमंत्र्यांच्या महत्वकांक्षी कॉपीमुक्त अभियानास धक्का लागल्याने शासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थानिक प्रशासनातील अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढल्याची चर्चा आहे.