यवतमाळ : राज्यात २० पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करून त्याऐवजी क्लस्टर स्कूल सुरू करण्याच्या हालचालींमुळे शैक्षणिक वातावरण तापले आहे. या वातावरणात मात्र यवतमाळ जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांचे दिवस पालटण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी ‘शिक्षण चेतना’ या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात ४६ ‘मॉडेल स्कूल’ची निर्मिती करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली.
या निर्णयामुळे जिल्हा परिषद शाळांचा कायापालट होण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील ज्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये १०० पेक्षा अधिक पटसंख्या आहे, त्या शाळांचा जिर्णोद्धार करणे, नवीन इमारत बांधणे, शाळांमध्ये शौचालय, चांगल्या वर्गखोल्या, प्रयोगशाळा, भौतिक व अत्याधुनिक सोयीसुविधा, स्मार्ट आणि डिजिटल शाळा करण्याचा निर्णय घेतल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. त्यासाठी जिल्हा खनिकर्म योजनेतून ४० कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्याचे निर्देश प्रशासनास दिल्याचे पालकमंत्री राठोड यांनी सांगितले.
हेही वाचा >>> नागपूर : ‘आई’नंतर २४ तासातच बाळाचा मृत्यू, मेडिकलच्या अतिदक्षता विभागात गोंधळ..
नवी पिढी सक्षम झाली पाहिजे, यासाठी जिल्हा परिषद शाळांचा विकास करण्याचा प्रयत्न आहे. स्मार्ट अंगणवाडी करण्यासाठी नवनवीन उपक्रम सुरु आहेत. निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आला आहे. या मॉडेल स्कुलमध्ये डेस्क, बेंच, आनंददायी पध्दतीने अध्ययन व अध्यापन प्रकिया होण्यासाठी अत्याधुनिक व भौतिक सुविधायुक्त अशा ४६ मॉडेल स्कूलची निर्मिती प्रायोगिक तत्वावर केली जाणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञांची समिती नेमली आहे. या समितीच्या शिफारशीने शाळांची निवड करण्यात आली आहे. या निर्णयाची खरोखरच अंमलबजावणी होते की, ऐनवेळी यात काही खोडा तर घातला जाणार नाही ना, अशी चर्चा शैक्षणिक वर्तुळात आहे.