नागपूर : शिष्यवृत्ती न मिळाल्याच्या विद्यार्थ्यांच्या अनेक तक्रारी असतात. यामुळे विद्यार्थ्यांना लाखो रुपयांचा भूर्दंडही बसत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा यासाठी शासनाकडून विशेष मोहिम घेतली जाणार आहे. राज्याच्या उच्च शिक्षण संचालनालयामार्फत विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून १४ शिष्यवृत्ती योजना राबविल्या जातात. मात्र प्रवेशित विद्यार्थ्यांच्या तुलनेत शिष्यवृत्तीसाठी अतिशय कमी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरले आहेत. त्यामुळे सर्व विद्यापीठ व महाविद्यालयांनी अधिकाधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेमध्ये सामावून घेण्यासाठी येत्या २५ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत विशेष मोहीम राबवावी, अशा सूचना शिक्षण विभागातर्फे देण्यात आले आहेत.
पुणे विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयातर्फे शिष्यवृत्ती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डेक्कन कॉलेज, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, गोखले इन्स्टिट्यूट, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, एसएनडीटी विद्यापीठ, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ यासह विद्यापीठांशी संलग्न सर्व अनुदानित विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित संलग्न महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज भरून घेण्यासाठी विशेष मोहीम राबवावे, असे आदेश देण्यात आले आहेत. उच्च शिक्षण विभागाच्या शिष्यवृत्ती योजनेसाठी प्रवेशित विद्यार्थ्यांच्या तुलनेत अतिशय कमी ऑनलाईन अर्ज महाडीबीटी पोर्टलवर प्राप्त झाले आहेत,असे शिक्षण विभागातर्फे वेळोवेळी घेण्यात आलेल्या ऑनलाईन मीटिंग, प्रसिद्ध करण्यात आलेली परिपत्रके, तसेच वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचनांमधून कळविण्यात आले आहे.
हेही वाचा…मुख्यमंत्रीपद, वाढलेली मतदान टक्केवारीवर, फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले
शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ व्हावी, या उद्देशाने महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांसाठी संगणक सुविधा, इंटरनेट सुविधा उपलब्ध करून द्यावी तसेच शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे. सर्व महाविद्यालय व संस्था आणि विद्यापीठ यांनी महाडीबीटी पोर्टलवर विशेष मोहीमे अंतर्गत राबविण्यात आलेल्या सप्ताहाच्या अनुषंगाने कार्यवाहीचा अहवाल उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयास सादर करावा, अशा सूचना पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक यांनी दिल्या आहेत. त्यामुळे सर्व महाविद्यालयांना येत्या २५ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्ती अर्ज भरून घेण्यासाठी विशेष सप्ताहाचे आयोजन करावे लागणार आहे.
हेही वाचा…शिस्त असावी तर अशी… ताडोबातील ते कुटुंब…
अर्ज कसा करावा
महाडीबीटी पोर्टलवर लॉगीन करण्यासाठी सिलेक्ट युजरमध्ये जावून विद्यार्थी हा पर्याय निवडावा, युजर नेम व पासवर्ड टाकून लॉगइन करावे. लॉगइन झाल्यानंतर विंडोमध्ये योजना तपशील यावर क्लिक करा. त्यानंतर विभागावार योजना आपण पाहू व निवडू शकाल. त्यानंतर कोणत्या योजनासाठी (मॅट्रीकपूर्व / मॅट्रीकोत्तर) आपण पात्र आहात त्याची खात्री करा व पर्याय क्लिक करा (उदा. शालेय विद्यार्थ्यानी मॅट्रीकपूर्व व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मॅटि्कोत्तर हा पर्याय निवडावा). आवश्यक ती सर्व माहिती उदाहरणार्थ जात, प्रवर्ग, महाराष्ट्राचे रहिवासी, अपंगत्व, कौटुंबिक उत्पन्न इत्यादी माहिती सॉफ्टवेअरमध्ये काळजीपूर्वक भरावी. पालकांची माहिती, शाळा/ महाविद्यालयाचा तपशील नमूद करावा. आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावीत (रहिवासी दाखला, उत्पन्न दाखला, एसएससी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र, बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक इत्यादी). अभ्यासक्रमाचा तपशील, मागील परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा तपशील इत्यादी सर्व माहिती अर्जदाराने भरावयाची आहे आणि सबमिशन पेजमधील सादर या बटनवर क्लिक करावयाचे आहे.