प्रशांत देशमुख, लोकसत्ता
वर्धा : सदैव चर्चेत राहणारी शालेय पोषण आहार योजना आता प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना म्हणून ओळखल्या जाते.याच योजनेत शाळेत अन्न शिजविण्यासाठी स्वयंपाकी व मदतनीस अडीच हजार रुपये मासिक मानधनावर नेमले जातात. पण गाव पातळीवरील स्वयंपाकी पोषणयुक्त अन्न शिजवित नसावे की काय ,अशी शंका शासनास आली असावी. कारण त्यांना स्वयंपाकात तरबेज करण्यासाठी खास प्रशिक्षन देण्याचा घाट शिक्षण विभागाने घातला आहे.
जळगावच्या अँनालिटीकल टेस्टिंग अँड रिसर्च लॅबची निवड प्रशिक्षण देण्यासाठी करण्यात आली आहे.हे प्रशिक्षण अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार ते द्यायचे आहे. हीच संस्था प्रशिक्षण दरम्यान प्रशिक्षण साहित्य,अल्पोपहार, प्रशिक्षकांचे मानधन,प्रमाणपत्र याचा खर्च करणार.शिवाय प्रशिक्षणास उपस्थित राहणाऱ्या लाभार्थी स्वयंपाकीला शंभर रुपये उपस्थिती मानधन मिळणार आहे. या प्रशिक्षनार्थींची यादी जिल्हा शिक्षणाधिकारी तयार करतील.हे प्रशिक्षण कशासाठी, असा प्रश्न मात्र मुख्याध्यापक वर्तुळात पडला आहे.कारण पोषण आहारात असे विशेष अन्न शिजतेच काय, स्वयंपाकी आता शिष्टसंमत शेफ होणार का,असे गमतीने विचारल्या जात आहे.