नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘प्रिय विद्यार्थी मित्रांना’ अशा मथळ्याखाली नुकतेच पत्र लिहिले आहे. ज्यात चांद्रयान-३ पासून तर विज्ञान, माहिती-तंत्रज्ञान, शेती, डिजिटल रोबोटिक प्रयोगशाळा, कला-वाणिज्य विषयांसह विविध क्षेत्रात पारंगत करणारे शिक्षण शाळांमधून देण्याबाबत सांगितले. ‘माझी शाळा सुंदर शाळा’ हे अभियानही सुरू केले. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या पत्रानंतर शिक्षण संस्थांचालकांनी विरोधी मोहीम छेडली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यात २०१२ पासून शिक्षक भरती बंद आहे, विद्यार्थ्यांना शिकवायला त्या-त्या विषयातील पारंगत शिक्षकच उपलब्ध नाहीत, प्रयोगशाळा नाही, इमारती मोडकळीस आल्या असताना मुख्यमंत्र्यांचे पत्र आाणि हे अभियान जखमेवर मिळ चोळणारे असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शिक्षण संस्था महामंडळाने ‘परीक्षांवर बहिष्कार’ आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा >>>रेल्वेगाड्या थांबल्या, विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची उचलबांगडी; नेमकं कारण काय? जाणून घ्या…

शिक्षण संस्था महामंडळाच्या प्रसिद्धी पत्रकानुसार, राज्यात २०१२ पासून शिक्षक भरती बंद आहे. विद्यार्थ्यांना त्या-त्या विषयातील पारंगत शिक्षकच उपलब्ध नाहीत. डिजिटल, रोबोटिक टिंकरिग प्रयोगाशाळेत ‘इलेक्ट्रॉनिक्स संगणक’ विषयातील पदवीधर किंवा अभियंता झालेले शिक्षक देण्याची घोषणा केली. पण, कोठेही नियुक्ती नाही. त्यामुळे ‘विषय शिक्षक’ शाळेत नसताना विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्याचे स्वप्न दाखविले जात असल्याचा आरोप शिक्षण संस्था महामंडळाने केला. शिकवायला शिक्षक नाहीत, शाळा स्वच्छतेसाठी शिपाई नाहीत, प्रयोगशाळेत परिचर नाहीत, कार्यालयीन कामकाजासाठी लिपिक नाहीत. यासाठी शासनाची धोरणे कारणीभूत आहेत. सर्व बहुजन समाजाला मिळणारे मोफत व दर्जेदार शिक्षण बंद करण्याचे षडयंत्र रचण्यात येत असून, सर्व ‘शिक्षणक्षेत्र’ कॉर्पोरेटच्या ताब्यात देऊन शिक्षण विकत घेण्याची व्यवस्था अस्तित्वात येत आहे. शाळा इमारती मोळकळीस आल्या आहेत. शाळांना कोणत्याही भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी निधी नाही. अशी सर्व विदारक परिस्थिती असताना ‘माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमात ५० लाखांचे बक्षीस जाहीर करणे हे न पटणारे आहे, असाही आरोप यात करण्यात आला आहे. शासनाच्या अशा धोरणामुळेच शिक्षण संस्था महामंडळाने ‘परीक्षांवर बहिष्कार’ आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनात सहभागी व्हा असे आवाहनही मंडळाने केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Education institutions oppose chief minister eknath shinde school initiative dag 87 amy