चंद्रशेखर बोबडे, लोकसत्ता
नागपूर : आर्थिक मंदीचा बँकांच्या कर्ज वसुलीवरही परिणाम झाला असून बँकांच्या शैक्षणिक कर्जाचीही थकबाकी वाढली आहे. एकटय़ा महाराष्ट्रात ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत १ लाख ९० हजार खातेदारांकडे ८८८२ कोटी रुपयांची थकबाकी होती.
राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या माहितीनुसार ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत संपूर्ण देशातील २२ लाख ५६ हजार ८५१ खातेदारांकडे ८९ हजार ४७७ कोटी रुपयांचे शैक्षणिक कर्ज थकीत आहे. यात महाराष्ट्रातील १ लाख ९० हजार खातेदारांकडील ८८८२ कोटी रुपयांच्या कर्जाचा समावेश होता. शैक्षणिकदृष्टय़ा प्रगत अशी ओळख असलेल्या दक्षिणेतील तसेस उत्तरेकडील काही राज्यांमध्ये शैक्षणिक कर्जाची थकबाकी ही हजारो कोटींमध्ये आहे. बँकिंग क्षेत्रातील जाणकारांच्या मते, इतर कर्जाच्या तुलनेत शैक्षणिक कर्ज खातेदाराच्या परतफेडीच्या क्षमतेची पडताळणी करून दिले जात असल्याने त्याच्या परतफेडीचे प्रमाणही इतर कर्जाच्या तुलनेत अधिक असते. साधारणपणे विदेशात शिक्षण घेण्यासाठी कर्ज घेणाऱ्यांची संख्या अधिक असते. खातेदाराने कर्ज घेतल्यानंतर साधारणपणे एक ते दोन वर्षांनंतर त्याची परतफेड सुरू होते. बँकांचे व्याज मात्र कर्जाची उचल केल्यानंतरच सुरू होते. त्यामुळे थकबाकीची रक्कम मोठी वाटते, असे बँक अधिकाऱ्यांचे मत आहे. सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू असल्याने दोन्ही देशांमध्ये शिक्षण घेणारे भारतीय विद्यार्थी तेथून मायदेशी परतले आहेत. यापूर्वी चीनमध्ये करोनाची साथ शिखरावर असताना तेथून मोठय़ा संख्येने विद्यार्थी परतले होते. तसेच काही वर्षांपूर्वी अमेरिकेत आलेल्या आर्थिक मंदीमुळे तेथील भारतीयांचा रोजगार गेला होता ते सुद्धा तेथून परतले होते. यापैकी बहुतांश जणांनी शिक्षणासाठी कर्ज घेतले होते. त्यामुळे कर्जाच्या परतफेडीचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता अधिक असल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, भारतात करोना टाळेबंदी काळातील कर्जदारांना दिलासा देण्यासाठी रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाने मार्च ते ऑगस्ट २०२० दरम्यान थकीत हप्तय़ांच्या भरणा करण्यावर सहा महिन्यांची स्थगिती दिली होती. कर्जाचे पुनर्गठन करण्यासाठी प्रोत्साहन उपाय लागू केले तरीही थकीत कर्जाचे आकडे हजारो कोटींच्या घरात असल्याचे राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या तपशिलात दिसून येते.
सामान्यपणे शैक्षणिक कर्जाची उचल केल्यापासून दोन वर्षांनंतर त्यांचे परतफेडीचे हप्ते सुरू होतात. कर्जधारक नोकरीवर लागल्यावर कर्जाची परतफेड करतात. मात्र बँकेच्या व्याजाची आकारणी कर्जाची उचल झाल्यापासून सुरू होते. त्यामुळे थकबाकीची रक्कम मोठी वाटते. सध्या युक्रेनमधून मोठय़ा संख्येने विद्यार्थी शिक्षण अर्धवट सोडून आले आहेत. यापैकी बहुतांश जणांनी शिक्षणासाठी कर्ज घतले आहे. त्यांचे कर्ज थकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
– जयंत गुरवे, सरचिटणीस इस्टर्न महाराष्ट्र बँक एम्प्लॉईज, असोसिएशन, नागपूर.
प्रमुख राज्यातील स्थिती
राज्य खातेदार रक्कम (कोटीत)
केरळ ३,०७६७० ११०५०.९०
कर्नाटक २,१०४३७ ७९६४.९८
तमिळनाडू ६,२५,७३५ १६३०१.९३
उत्तर प्रदेश १,०५१४२ ४२६९.५८