लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी ९ वाजल्यानंतरच सुरू करण्यात येईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी केली. याबाबत अंतिम निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. मुलांची झोप पूर्ण व्हावी, यासाठी राज्यपाल रमेश बैस यांनी याबाबत सूचना केली होती.

बदलत्या जीवनशैलीमुळे पहाटे शाळा असेल तर लहान मुलांची झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे त्यांची शाळा उशिराने सुरू करण्याबाबत सरकारने विचार करावा, असे राज्यपालांनी अलिकडेच सुचविले होते. राज्यपालांच्या या मताशी सरकार सहमत आहे. मात्र एकट्याने याबाबत निर्णय घेणे योग्य नसल्याने तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे. मनोवैज्ञानिक, बालरोग तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे केसरकर यांनी सांगितले.

हेही वाचा >>>“शिवपुराणाच्या नावाखाली अंधश्रद्धेला खतपाणी; मंडपातील तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबांचे फोटो काढा”, रुपराव वाघ यांची मागणी

पुढील शैक्षणिक वर्षापासून सर्व माध्यमांच्या आणि सर्व शिक्षण मंडळांच्या शाळांना हा नियम लागू असेल, असेही ते म्हणाले. सकाळच्या सत्रातील शाळेची वेळ सात ऐवजी नऊपर्यंत पुढे ढकलल्यास मुलांची झोप पूर्ण होऊन त्यांना शिक्षणाची गोडी लागेल, असे केसरकर यांनी स्पष्ट केले.

नवा पूर्व प्राथमिक विभाग

●बालवाडी, छोटा शिशू आणि मोठा शिशू हे वर्ग निर्माण करून ते मुख्य शाळेला जोडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

●त्यानंतर आता बालवाडी ते दुसरीला ‘पूर्व प्राथमिक विभाग’ संबोधण्यात येणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Education minister deepak kesarkar announcement regarding school timings for students from academic year to class second amy