भंडारा : माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर सुरळीत सुरू असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाकडून केला जात असला तरी एका केंद्रावर झालेल्या गैर प्रकाराच्या तक्रारीने शिक्षण विभागाची झोप उडाली आहे. “शिक्षणाधिकारी (माध्य.) यांनी  संवेदनशील केंद्रातील यादीमधुन तीन केंद्रांची नावे काढून टाकली आहेत. परीक्षे दरम्यान केंद्र संचालक आणि बैठे पथक यांना चिरीमिरी देऊन शांत बसविण्यात येते’ अशी तक्रार काल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयाला प्राप्त झाली. या तक्रारीत अनेक गंभीर आरोप आणि गौप्यस्फोट करण्यात आले असून जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात सगळीकडे या विषयाची चर्चा आहे.

जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयाकडे १८ फेब्रुवारी रोजी आलेल्या या तक्रारीची कार्यालयीन प्रत ‘लोकसत्ता’च्या हाती लागली आहे. यात शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले असून एका कनिष्ठ विद्यालयावरही खळबळजनक आरोप करण्यात आले आहेत. शरद गोमासे असे तक्रारकर्त्याचे नाव आहे.

या तक्रारीत गोमासे यांनी आरोप केले आहेत की, ओम सत्य साई ज्युनियर कॉलेज परसोडी या कनिष्ठ महाविद्यालय  झिरो अटेंडन्स देऊन परीक्षेत उत्तीर्ण करून देण्याच्या नावावर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.  संभाजीनगर, गोंदिया, नागपुर, अमरावतीचे विद्यार्थी येथे प्रवेश घेत आहेत. बोर्डाच्या परीक्षे दरम्यान मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार करण्यात येतो आणि वि‌द्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्यात येत आहे. यामध्ये संपूर्ण शिक्षण यंत्रणा गुंतलेली आहे असे आरोप गोमासे यांनी केले आहेत.

शिक्षणाधिकारी (माध्य.) यांनी नुकतेच संवेदनशील केंद्रातील यादीमधुन तीन केंद्रांची नावे काढून टाकलेली आहे. परीक्षेच्या दरम्यान केंद्र संचालक आणि बैठे पथक यांना पैसे देऊन शांत बसविण्यात येते.

या सर्व गोष्टीच्या प्रत्यय दिनांक ११ फेब्रुवारी रोजी झालेल्या इंग्रजीच्या पेपरच्या दिवशी आलेला आहे. इंग्रजीच्या पेपरला मायक्रो झेरॉक्स केलेली उत्तरे कॉपीच्या स्वरूपात विद्यार्थ्यांना पुरवण्यात आली. त्याचे पुरावे देखील तक्रारकर्ते गोमासे यांनी शिक्षण विभागाला सादर केले आहेत.

बोर्डाच्या नियमानुसार एका बाकावर एक अशी बैठक व्यवस्था करायची असताना या परीक्षा केंद्रांवर एका बाकावर दोन मुले बसविण्यात आलीत.  . तसेच इतर खोल्यांमध्ये प्रश्नांची उत्तर शोधण्याचे काम सुरु असते ज्यात विषय शिक्षक सुद्धा लिप्त आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांना परीक्षेचा कलावधी उलटूनही अधिक वेळ बसविण्यात येते. भरारी पथकाच्या आगमनाची पूर्व सूचना एका कर्मचाऱ्या मार्फत मिळविली जाते.

उत्तराच्या मायक्रो झेरॉक्स काढून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात येते. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांकडून ३००० रुपये अधिकचे घेण्यात आलेले आहे असे परिक्षार्थ्यानी सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे. उल्लेखनीय बाब अशी की, शरद गोमासे या तक्रारदाराने यापूर्वी १४ फेब्रुवारी रोजी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडे याच परीक्षा केंद्रावर गैरप्रकार सुरू असल्याची तक्रार केली होती.

याबाबत विचारणा करण्यासाठी शिक्षणाधिकारी माध्यमिक रवी सलामे यांना संपर्क केला असता हे सर्व आरोप खोटे आहेत. याबाबतीत चौकशी करण्यात येईल असे सलामे यांनी सांगितले. याबाबत ओम सत्यसाई बहुउद्देशिय शिक्षण संस्थेचे  मुख्याध्यापक वाडीभस्मे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, त्यांच्या शाळेची बदनामी करण्यासाठी असे बिन बुडाचे आणि तथ्यहीन आरोप केले जात आहेत. शिवाय वाडीभस्मे यांनी मागणी केली आहे की, तक्रारकर्त्यांने समोर येऊन  केलेले आरोप पुराव्यानिशी सिध्द करावे.

Story img Loader