जरीपटका, मारुती शोरूम, वीटभट्टी चौकात तीन वर्षांत २९ अपघाती मृत्यू

उत्तर नागपुरातील वळण मार्गावरील (रिंग रोड) मारुती शोरूम चौ क, जरीपटका चौक आणि वीटभट्टी चौक हे दुचाकी तसेच सायकल चालकांसाठी मरणस्थळ ठरले आहे. गेल्या तीन वर्षांत या चौकात थोडेथोडके नव्हे तर तब्बल २९ अपघाती मृत्यू झाले असून १०० हून अधिक जखमी झाले. या अपघातासाठी अनियंत्रित वाहतूक, खराब रस्ते आणि अपुरी प्रकाशव्यवस्था कारणीभूत आहे.

मारुती शोरूम चौकात वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे अधिक अपघात झाल्याचे दिसून येते. या चौकातून कळमना ते मानकापूर अवजड वाहने जातात. तर शहडोल, जबलपूर, सिवनी रामटेककडेही वाहने जातात. वाहनांचा वेग आणि नियंत्रण सुटल्यानंतर त्या ठिकाणी अपघात होतात. त्यात आजपर्यंत अनेकांनी जीव गमावला आहे. जरीपटका आणि वीटभट्टी चौकातील स्थिती कमी अधिक प्रमाणात अशीच आहे. या रस्त्यांवरून वाहने जीव मुठीत घेऊनच चालवावी लागतात. कोणते वाहन कधी धडक देईल, याचा काहीही नेम नसतो. चौकातील वाहतूक नियंत्रित करण्याची जबाबदारी असणारी पोलीस यंत्रणा वर्दळीच्या वेळी गायब झालेली असते.

मारुती शोरूम चौक पूर्व आणि पश्चिम नागपूरला जोडणारा रिंग रोड उत्तर नागपुरातून जातो. कामठीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मारुती शोरूम चौक आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या दिशेकडून पाच रस्ते एकत्र येतात. इतवारी दही बाजारकडून येणारा, कळमनाकडून येणारा, मानकापूरकडून येणारा, इंदोराकडून येणारा आणि कामठीकडून येणारा रस्ता या चौकात येऊन मिळतो. पाच रस्ते येथे जोडले जात असल्याने चौकाचा आकारही मोठा आहे. सिग्नलची वेळही अधिक आहे. येथे चोवीस तास जड वाहनांची वर्दळ असते. वेळ वाचण्यासाठी दुचाकी, सायकलचालक ग्रीन सिग्नल झाल्यावर पुढे निघण्याचा प्रयत्न करतात. राणी दुर्गावती चौकाकडून कामठीकडे जाताना ग्रीन सिग्नल मिळाल्यावर कामठीहून नारा-नारीकडे जाणारे दुचाकी चालक वाहने वेगाने पुढे नेतात. त्यामुळे राणी दुर्गावती चौकाकडून येणारे वाहन आणि कामठीकडून येणाऱ्या वाहनांची बहुतेक वेळा धडक होते. तसेच इंदोरा चौकाकडून कळमना चौकाकडे जाताना कळमनाकडून मानकापूरकडे जाणारी वाहने परस्परांना धडकतात.

अपघाताची कारणे –

मारुती शोरूम चौकातील रस्ते खराब आहेत. काही ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहेत. चौकातील सिग्नल चुकीच्या ठिकाणी बसवण्यात आले आहेत. सिग्नल नेमका कोणत्या बाजूचा ग्रीन सिग्नल झाला, याबद्दल संभ्रम निर्माण होतो. हा चौक मोठा असल्याने चौक पार करण्यासाठी अधिक वेळ लागतो. राँग साईडने वाहने घालणे, रेड सिग्नल संपल्यावरही वाहने दामटण्याचा प्रयत्न करतात. जोडीला घाई आणि निष्काळजीपणा, यामुळे सर्वाधिक अपघात होत असल्याचे चौकाच्या शेजारचे दुकानदार सांगतात.

जरीपटका रिंगरोड चौक

जरीपटका रिंग रोड चौकात पोलीस ठाणे आहे, परंतु येथील सिग्नल कधीच सुरू नसतात. शिवाय वाहतूक पोलीस चौकात न थांबता शेजारच्या औषध दुकानात बसतो. चौकातील रस्त्यांचे बांधकामही अयोग्य आहे. रस्ता उंच आहे तर जोड रस्ते तुलनेने कमी उंचीचे आहेत. रिंग रोडवर खड्डे आहेत. एका बाजूला संत लहानूजी नगर, दुसऱ्या बाजूला जरीपटका परिसर आहे. जरीपटक्याकडून संत लहानूजी नगरकडे जाणारी दुचाकी वाहने किंवा पादचारी दुसरीकडून येणाऱ्या वाहनांची पर्वा न करता रस्ता ओलांडतात. मानकापूरकडून व मारुती शोरूम चौकाकडून येणारे ट्रक चौकात उभे असलेल्या दुचाकी किंवा सायकल चालकाला चिरडण्याची शक्यता असते.

‘‘मारुती शोरूम चौकात चोवीस तास वाहतूक असते. येथे अपघात होण्याची दोन ठिकाणे आहेत. कळमनाकडून येणारी वाहने जेथे थांबतात ते ठिकाण आणि मानकापूरकडून येणारी वाहने जेथे थांबतात ते ठिकाण. अपघात सकाळी होतात. वाहूतक पोलीस नसल्यामुळे आणि अवजड वाहनांची वर्दळ कमी असल्याने दुचाकी, चारचाकी चालक सिग्नल तोडून वाहने दामटतात.’’ – मुकीम खान, मारुती शोरूम चौकातील खासगी वाहतूक व्यावसायिक.

‘‘रिंग रोडची कायमच दुर्दशा असते. त्यांना खड्डय़ातून वाहने काढावी लागतात. लहानुजीनगर तसेच जरीपटका पोलीस ठाण्याच्या आजूबाजूला मोठी वस्ती आहे. चौक ओलांडताना लोकांना घाई असते. जड वाहने अगदी जवळ असताना ते रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतात. रस्ता खराब असल्याने अपघात होण्याची भीती असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोलीस वाहतूक नियंत्रित करत नाही.’’  – आनंदराव घोडेस्वार, जरीपटका रिंग रोड चौकातील फळ विक्रेता.