नागपूर : नागपूरच्या नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्व्हे अँड लँड युज प्लॅनिंग (एनबीएसएसएलयूपी) या संस्थेद्वारे महाराष्ट्रातील पाच हजार गावांमध्ये वातावरण बदलास अनुकूल माती संशोधन केले जात आहे.
भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) अखत्यारित काम करणाऱ्या या संस्थेने राज्यातील नानाजी देशमुख कृषी संजीवन प्रकल्पातील १७ जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित केले असून त्यातील पाच हजार गावे त्यांच्या प्रयोगासाठी निवडली आहेत. संस्थेने तयार केलेल्या ‘भूमी’ या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील मातीचे रासायनिक व भौतिक परीक्षण पाहणे शक्य होणार आहे, अशी माहिती संस्थेचे संचालक डॉ. नितीन पाटील यांनी दिली.
हेही वाचा – वाशिम जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट अधिक गडद! तीन-चार दिवसांत पाऊस न आल्यास..
संस्थेचा ४७ वा स्थापना दिवस १ सप्टेंबर रोजी साजरा होणार असून याप्रसंगी भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उपमहासंचालक डॉ. एस.के. चौधरी, गडचिरोली पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. संस्था गेल्या ४६ वर्षांपासून भारतातील भूसंपत्तीची माहिती संकलित करीत आहे. संस्थेचे बंगळुरू, कोलकता, जोरहाट, नवी दिल्ली, उदयपूर येथे प्रादेशिक केंद्र असून नागपुरात मुख्यालय आहे.