नागपूर :- आपल्या हरवलेल्या ४८ वर्षीय मनोरूग्ण भावाचा शोध घेत फिरणा-या बुलढाणा येथील ६३ वर्षीय अण्णा बेर्डे (नाव बदललेले) यांच्या कष्टाला  १५ फेब्रुवारी २०२५ रोजी यश मिळाले. मागील साडेतीन महिन्यांपासून बेर्डे हे गल्लोगल्ली फिरून भावाचा शोध घेत होते.  शनिवारी आपला भाऊ मिळताच त्याचे डोळे ओलावले.या कठीण काळामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नागपूरचे मनोन्याय कायदेशीर सेवा पथक त्यांच्या मदतीसाठी सोबत होते.

या बाबतची हकीकत अशी की, दिनांक २९ ऑक्टोबर २०२४ रोजी अण्णा हे नागपूर येथील मोरभवन बस स्थानक परिसरामध्ये गाडी शोधत असताना त्यांच्या सोबत असलेला त्यांचा ४८ वर्षीय मनोरूग्ण भाऊ ओमप्रकाश (नाव बदललेले) हरवला. त्याचा शोध घेऊनही भाऊ मिळून न आल्याने त्यांनी सीताबर्डी पोलीस ठाण्यामध्ये भाऊ हरवल्याची तक्रार  दिली. भावाचा शोध न लागल्याने त्यांनी स्वतः नागपूर शहरातील गल्लोगल्ली फिरून वेगवेगळी मंदीरे, दर्गे व इतर सार्वजनिक ठिकाणांवर शोध घेण्यास सुरुवात केली.नागपूरसह त्यांनी वर्धा, चंद्रपूर, अमरावती, सावनेर, वाकी, इत्यादी ठिकाणी देखील निरंतर शोध घेउन देखील त्यांना यश आले नाही. अखेर त्यांनी नागपूरच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला साद घातली. कायदेशीर सेवा पथक लागलीच त्यांना मदतीसाठी धावून आले व त्यांच्या खडतर प्रवासाचा शेवट गोड झाला.

नागपूर शहरातील सीसीटीव्ही फुटेज पडताळून घेण्यात आले. रहाटे कॉलनी चौक, वर्धा दिशेने आपला मनोरुग्ण भाऊ जात असल्याची माहिती यातून मिळाली.वर्धा व यवतमाळ येथील अशा व्यक्तींसाठी कार्य करणा-या संस्थांचे सोशल मिडीयावरील सीसीटीव्ही फुटेज पडताळून घेतल्यानंतर नंदादीप फाउंडेशन, यवतमाळ यांच्या एका व्हिडीओमधील व्यक्तींपैकी एक व्यक्ती त्यांचा बेपत्ता भाऊ असल्याचे अप्पा बेर्डे यांनी ओळखले. न जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नागपूर यांचे कायदेशीर सेवा पथक तात्काळ नंदादीप फाउंडेशन, यवतमाळ येथे गेले असता तेथे त्यांचा बेपत्ता मनोरूग्ण भाऊ मिळून आला आणि आप्पा बेर्डे यांचा मागील साडेतीन महिन्यांपासून सुरू असलेला खडतर शोधप्रवास अखेर संपला

नागपूरचे जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. पी. सुराणा यांनी नागपूर शहरातील  मानसिक आजार असलेल्या व्यक्ती व बौधिक अपंग व्यक्तीसाठी न्यायाधीश सचिन स. पाटील, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नागपूर यांच्या नेतृत्वाखाली स्थापित केलेले मनोन्याय कायदेशीर सेवा पथक सेवाभावी संस्था, नागपूर पोलिस विभाग, शासकीय रुग्णालय यांच्या सहकार्याने शहरातील कुटुंबापासून भरकटलेल्या फिरस्ता मनोरुग्ण व्यक्तींचा शोध घेवून सर्व न्यायालयीन प्रक्रिया पार पाडते. त्यांना उपचारकामी व सुरक्षेकामी प्रादेशिक मनोरुग्णालय, नागपूर येथे दाखल करण्याची मोहीम देखील राबविते.

Story img Loader