लोकसत्ता टीम

बुलढाणा : जिल्ह्यातील अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीचे मोठे केंद्र ठरलेल्या खडकपूर्णा धरणामध्ये जिल्हा शोध पथकाने मोठी कारवाई केली. यावेळी रेती तस्करांच्या आठ बोटी स्फ़ोटकांनी उडवून देण्यात आल्या आहे. कारवाईच्या धास्तीने तस्करांनी काही बोटी धरणात बुडवून टाकल्याचे वृत्त आहे.

सोमवारी रात्री उशिरा या बोटी किनाऱ्यावर आणून जिलेटिनच्या सहाय्याने उडवून देण्यात आल्या. बुलढाणा जिल्हास्तरीय शोध पथकाने सोमवारी दिवसभर खडक पूर्णा धरणामध्ये वाळू माफिया विरोधात मोठी कारवाई केली. देऊळगाव राजा तालुक्यातील खडक पूर्णा प्रकल्पात अवैधरित्या उपसा करणाऱ्या बोटींचा शोध घेण्यासाठी महसूल विभागाने राज्यस्तरीय शोध व बचाव पथकाच्या साह्याने शोध मोहीम हाती घेतली.

या अगोदर खडकपूर्णा धर क्षेत्रातून वाळू उपसणाऱ्या २८ बोटी नष्ट करण्यात आल्या होत्या. काही दिवसाची उसंत घेतल्यानंतर तस्करांनी पुन्हा डोके वर काढले. शिरजोर होत पुन्हा मोठमोठ्या बोटी रेती उपसा करण्यासाठी धरणात उतरविण्यात आल्या होत्या. यासंदर्भात देऊळगाव राजा पोलीसांकडे १९ मार्चला खडकपूर्णा व्यवस्थापन उपविभागाचे सहाय्यक अभियंता एस. जे. तल्हार यांनी तक्रार दिली होती. त्याची दखल घेत महसूल विभागाने पोलिसांच्या मदतीने ही मोहीम राबविली. जिल्हास्तरीय शोध व बचाव पथकाने मोठा विस्तार असलेल्या खडकपूर्णा धरणात दिवसभर शोध मोहीम चालू ठेवण्यात आली.

दरम्यान संध्याकाळी गारखेड व मंडपगाव चिंचखेड शिवेजवळ अवैध रेती उपसा करणाऱ्या चार फायबर बोटी व चार इंजन बोटी अशा एकूण आठ बोटी पकडण्यात आल्या. मात्र अंधाराचा फायदा घेत त्यामधील मजूर पळून गेले. त्यामुळे या आठ बोटी कुणाच्या आहेत त्याची माहिती मिळू शकली नाही. किनाऱ्यावर आणून स्फोटके लावून आठ बोटी नष्ट करण्यात आल्या.बुलढाणा जिल्हधिकारी किरण पाटील यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांच्या नियंत्रणात ही कारवाई पार पडली.

तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्यासह नायब तहसीलदार प्रवीण घोटकर नायब तहसीलदार सायली जाधव मंडळ अधिकारी विजय हिरवे, काशिनाथ ईप्पर रामदास मांन्टे, अंढेरा मंडळ अधिकारी प्रल्हाद केदार, ग्राम महसूल अधिकारी विलास नागरे, परमेश्वर बुरकुल तलाठी, संजय हाडे. सुरेश डोईफोडे. मधुकर उद्धार, संजय बराडे, राजू तागवले, आकाश खरात,अंढेरा तलाठी तेजस शेट्टे. कृष्णा खरात. खडकपूर्णा प्रकल्पचे अधिकारी एस.जे तल्हार, शोध पथकाचे उद्धव सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक तारासिंग पवार, पोलीस जमादार गुलाब सिंग राजपूत संदीप पाटील, सलीम बरडे प्रदीप सोनवणे आणि सहाय्यक निरीक्षक नारायण गीते, हवालदार डिगोळे ठाकरे यानी ही कारवाई केली आहे.

अडचणीच अडचणी

दरम्यान या बृहत धरणात कारवाई करण्यात अनेक अडचणी येतात. खडकपूर्णा धरणचा परिसर मोठा असून जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद पर्यंत पसरला आहे. यामुळे कारवाई पथक नजरेत आले की बोटी जाफ्राबाद हद्धीत पळून जातात. यामुळे कालही शोध मोहीम घेण्यात अडचणीचा सामना करावा लागला. तरीदेखील बोटीचा शोध घेण्यात आला. बेशरमाच्या झाडीमध्ये या बोटीला लपवण्यात आल्या होत्या. त्या बोटीपर्यंत पोहोचण्यास अडचणी आल्या. तसेच त्यानंतर नष्ट करण्यासाठी सुद्धा अडचणीचा सामना करावा लागला .जीलेटिन च्या सहाय्याने चार वेळा स्फोट करून नष्ट करण्याची कारवाई काल रात्री साडे आठ वाजेपर्यंत राबवण्यात आली. जलसंपदा विभागाने सुद्धा मोहीम राबवून बोटीवर कारवाई करावी अश्या सूचना देण्यात आल्याचे सिंदखेड राजा उप विभागीय अधिकारी संजय खडसे यांनी सांगितले.