नागपूर : चित्ता स्थलांतर प्रकल्पाअंतर्गत दक्षिण आफ्रिकेतील बोत्सवाना येथून पुन्हा एकदा भारतात आठ चित्ते आणले जाणार आहेत. दोन तुकडीत हे चित्ते भारतात आणण्यात येणार आहेत. त्यापैकी पहिल्या तुकडीत चार चित्ते येत्या मे महिन्याच्या अखेरपर्यंत आणले जाणार असल्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने ही माहिती दिली असून याबाबत मध्यप्रदेश सरकारने एक प्रसिद्धीपत्रक दिले आहे. शुक्रवारी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या उपस्थितीत चित्ता प्रकल्पाची आढावा बैठक घेण्यात आली. दक्षिण आफ्रिका, बोत्सवाना आणि केनिया येथून भारतात चित्ते आणण्यात येणार आहेत. हे चित्ते दोन तुकड्यांमध्ये भारतात आणले जातील.

बोत्सवाना येथून चार चित्ते मे महिन्यापर्यंत आणि त्यानंतर आणखी चार चित्ते आणले जातील. दरम्यान, भारत आणि केनिया यांच्यातील करार अंतिम टप्प्यात आला आहे, असेही या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. देशातील चित्ता प्रकल्पावर आतापर्यंत ११२ कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च झाला आहे. त्यापैकी ६७ टक्के खर्च मध्यप्रदेशातील चित्ता पूनर्वसनासाठी गेला आहे.

गांधीसागर अभयारण्यात स्थलांतर

दरम्यान चित्ता प्रकल्पाअंतर्गत याआधी आणलेल्या चित्त्यांना कुनो राष्ट्रीय उद्यानातून गांधीसागर अभयारण्यात टप्प्याटप्प्याने स्थलांतरित करण्यात येणार आहे. हे अभयारण्य राजस्थानच्या सीमेला लागून असल्यामुळे मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये आंतरराज्य चित्ता संवर्धन क्षेत्र स्थापन करण्यासाठी तत्वतः करार झाला आहे. कुनो राष्ट्रीय उद्यान आणि गांधी सागर अभयारण्यात ‘चित्ता मित्रांना’ त्यांची क्षमता वाढवण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जात असल्याचे देखील प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये कुनोमध्ये पाच मादी आणि तीन नर असे आठ चित्ते नामिबियातून स्थलांतरित करण्यात आले. तर फेब्रुवारी २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेतून केएनपीमध्ये आणखी १२ चित्ते स्थलांतरित करण्यात आले.

कुनो राष्ट्रीय उद्यानात आता २६ चित्ते

कुनो राष्ट्रीय उद्यानात आता २६ चित्ते आहेत. यात १४ भारतात जन्मलेले आहेत. त्यापैकी १६ खुल्या जंगलात आणि १० पुनर्वसन केंद्रात आहेत. या चित्त्यांवर लक्ष ठेवण्यासाठी ‘उपग्रह कॉलर आयडी’चा वापर केला जात आहे. ज्वाला, आशा, गामिनी आणि वीरा या मादी चित्त्यांनी बछड्यांना जन्म दिला आहे. चित्त्यांमुळे कुनो राष्ट्रीय उद्यानातील पर्यटकांची संख्या गेल्या दोन वर्षात वाढली आहे. दरम्यान, कुनोत चित्ता सफारी सुरू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र, त्यावर अजूनही निर्णय झालेला नाही.