नागपूर : आठव्या वर्गात शिकणाऱ्या बहिणीच्या वर्गमैत्रीणीवर सातव्या वर्गात शिकणाऱ्या मुलाचा जीव जडला. दोघांचे अल्पवयीन प्रेम काही दिवसांत फुलले. मुलगी तब्बल चार महिन्यांची गर्भवती झाल्यानंतर डॉक्टरांकडे गेल्यावर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी तक्रारीवरुन पोलिसांनी सातव्या वर्गात शिकणाऱ्या मुलाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात पीडित १५ वर्षीय मुलगी बबली (काल्पनिक नाव) आईवडिलांसह राहते. ती शाळेत जाण्यापूर्वी वर्गमैत्रिणीच्या घरी जात होती. बबली आणि मैत्रीण दोघीही सोबत शाळेत जात होत्या. मैत्रिणीचा लहान भाऊ बंटी हा सातव्या वर्गात आहे. बबली आणि बंटी यांच्यात मैत्री झाली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. बहिण घरी नसतानाही बबली ही भेटायला येत होती. तसेच शाळेचे पुस्तक नेऊन देण्याच्या बहाण्याने बंटीसुद्धा तिच्या घरी जात होता. २५ जानेवारीला बबली ही मैत्रिणीला भेटायला घरी आली. मात्र, मैत्रिण शेतात गेली होती. त्यावेळी बंटी एकटाच घरी होता. बंटीने तिला प्रेमाची मागणी घातली. तिनेही होकार दिला. दोघांनीही शारीरिक संबंध प्रस्थापित केले. अशा प्रकारे बबलीचे आईवडिल शेतात गेल्यानंतर वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. एप्रिल महिन्यात बबलीच्या पोटात दुखायला लागले. त्यामुळे तिला खासगी रुग्णालयात दाखविण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली असता मुलगी चार महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. तिच्या आईचा विश्वासच बसत नव्हता. शेवटी डॉक्टरांनी पुन्हा तपासणी करून खात्री केली. आईने बबलीच्या कानशिलात मारली आणि घरी नेले. सायंकाळी कुटुंबातील सदस्यांनी तिला विचारणा केली.
हेही वाचा… अकोला: मणक्यात इंजेक्शन दिल्याने रुग्णाचा मृत्यू; तब्बल वर्षभरानंतर डॉक्टरवर गुन्हा दाखल
अल्पवयीन असलेला प्रियकर बंटीचे नाव समोर आले. त्यांनी बंटीला घरी बोलावले. माझे तिच्यावर प्रेम असून आम्ही लग्न करणार आहे, अशी बंटीने प्रेमाची कबुली दिली. हे प्रकरण मौदा पोलीस ठाण्यात पोहचले. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सातवीत असलेल्या बंटीला ताब्यात घेतले आणि बालनिरीक्षणगृहात रवानगी केली. पुढील तपास सुरू आहे.