भंडारा : जवाहरनगर आयुध निर्माण करणाऱ्या कारखान्यामध्ये शुक्रवारी झालेल्या भीषण स्फोटात आठ जणांना प्राण गमवावे लागले, तर पाच जण गंभीर जखमी झालेत. आज अंत्यसंस्कार करण्यापूर्वी आठही मृतदेह कंपनीच्या मुख्यप्रवेश द्वराजवळ असलेल्या शेडमध्ये आणण्यात आले. एकाच रांगेत आठ मृतदेह. मन उद्विग्न करणारे ते दृश्य. स्फोटानंतर मृतांचे नातेवाईक व गावकऱ्यांच्या संतापाचा भडका उडाला आणि घटनास्थळी मोठा तणाव निर्माण झाला. जोवर लिखित स्वरूपात मागण्या पूर्ण होणार नाही तोवर मृतदेह हलवणार नाही, असा आक्रमक पवित्रा कुटुंबीयांसह हजारोंच्या संख्येने जमलेल्या लोकांनी घेतला. कंपनीकडून मागण्या पूर्ण करण्याचा शब्द दिला जात नसल्याने तब्बल पाच तास आठही मृतदेह ठेवण्यात आले. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
भंडाऱ्याच्या जवाहरनगर येथील आयुध निर्माण कंपनीत काल २४ जानेवारी रोजी भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत ८ कामगारांना आपला जीव गमवावा लागला तर, पाच कामगार मृत्यूशी झुंज देत आहेत. मृताच्या नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांच्यानी शनिवारी सकाळी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर ठाण मांडत मागण्या पूर्ण होईपर्यंत मृतदेह घरी नेणार नसल्याची आक्रमक भूमिका घेतली आहे. यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांना धक्काबुक्की देखील करण्यात आली. त्याच वेळी आमदार, खासदार यांच्यासमोरच ‘मुर्दाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या. मागण्यांच्या पूर्ततेनंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले.
मृतांचे नातेवाईक व गावकऱ्यांच्या मागण्या
आयुध निर्माणी कंपनीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा.
मृत कामगारांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत, तसेच कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी.
साहुली गावाचे पुनर्वसन करा.
घटनेच्या चौकशीसाठी एसआयटी गठीत
या घटनेची संपूर्ण चौकशी व्हावी, यासाठी भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी नऊ सदस्यीय एसआयटी गठीत केली आहे. या एसआयटीत आयुध निर्माणी कंपनीतील कुणाचाही समावेश नसल्याने ही चौकशी समिती निष्पक्षपणे चौकशी करेल, असा विश्वास पोलीस अधीक्षकांनी व्यक्त केला.
३० लाखांची मदत
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली. सोबतच कंपनीच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकांनी आयुध निर्माणीकडून २५ लाखांची मदत जाहीर केली.