अकोला : वाशीम जिल्ह्याच्या राजुरा गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. राजूरा गावात सोमवारी रात्री एका घरामध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या भीषण दुर्घटनेमध्ये आठ वर्षीय चिमुकल्याचा होरपळून मृत्यू झाला, तर आजी गंभीर जखमी झाली. आजीची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर अकोल्यातील खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत.
वाशीम जिल्ह्यातील राजूरा येथील सुनीता बोंढारे महिला आपल्या आठ वर्षीय नातू चरण बोंढारेसह रात्री घरात होत्या. यावेळी अचानक घरातील सिलिंडरचा मोठा स्फोट झाला. घरात सर्वत्र आगीचा भडका उडाला. आजी आणि नातू आगीच्या विळख्यात सापडले. त्यामुळे जीवाच्या आकांताने ते ओरडत होते.
शेजारच्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाणी टाकत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. आगीमध्ये होरपळलेल्या दोघांनाही घराच्या बाहेर काढले. ते दोघेही आगीमध्ये भाजून गंभीर जखमी झाले होते. त्या दोघांनाही तत्काळ उपचारासाठी वाशीम येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. आगीत प्रचंड होरपळलेल्या आठ वर्षीय चरण बोंढारे या मुलाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. आगीमध्ये मोठ्या प्रमाणात भाजला गेल्याने आठ वर्षीय चिमुकल्याचा जीव वाचवणे शक्य झाले नाही, असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
आजीची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोल्यात पाठविण्यात आले. अकोला येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच मालेगाव पोलीस व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाल होते. त्यांनी आग विझवून परिस्थिती नियंत्रणात आणली. गॅस सिलिंडरमधील गळतीमुळे स्फोट होऊन आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
गॅस सिलिंडरच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
वाशीम जिल्ह्यातील राजुरा गावात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन आठ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला, तर आजी गंभीर जखमी झाली आहे. या दुर्घटनेमुळे गॅस सिलिंडरच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. अत्यंत ज्वलनशील असलेल्या एलपीजी गॅस सिलिंडरचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. गॅस गळती होत असल्यास तत्काळ उपाययोजना करून ती रोखण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक ठरते. गॅस सिलिंडरचा सुरक्षित वापर व अपघात रोखण्याच्या दृष्टीने जनजागृती महत्त्वाची आहे.