चंद्रपूर: पिंपरी-चिंचवड येथील अवघ्या आठ वर्षांची सुरभी ढगे ही गजानन भक्तांना मुखोद्गत पारायण सांगणार आहे. सुरभी हिला गजानन महाराज यांचे २१ अध्याय मुखापथ आहे. विशेष म्हणजे भविष्यात तिला डॉक्टर, अभियंता किवा अधिकारी व्हायचे नाही तर गजानन महाराज यांचे पारायण सांगायचे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्री गजानन महाराज ट्रस्ट आणि श्री गजानन गौरव गाथा समितीच्यावतीने वडगाव येथील गजानन महाराज मंदिर परिसरात पारायणाचे आयोजन २४ ते २६ नोव्हेंबरपर्यंत दररोज सायंकाळी ५ ते रात्री ८ वाजतापर्यंत पारायण आयोजित केले आहे. कुतुहलाची बाब म्हणजे पिंपरी-चिंचवड येथील अवघ्या आठ वर्षांची सुरभी ढगे हिला गजानन महाराज यांचे पारायण मुखोद्गत आहे. अवघ्या चार वर्षापासून सुरभी घरी आईसोबत पारायण करीत होती.

हेही वाचा… नागपूर : फळ व्यापाऱ्याची १५ लाखांनी फसवणूक

सुरभी ढगे ही आता इयत्ता दुसरीत शिक्षण घेत आहे. आई भाग्यश्री ढगे या फॅशन आर्टिस्ट आहे. वडिल सुनील ढगे हे इलेक्ट्राॅनिक्स इंजिनिअर आहेत. मोठा भाऊ शंतनु हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. घरातील सर्वच मंडळी गजानन महाराजांची भक्ती करतात. करोना काळात सर्वत्र लाॅकडाऊन असताना सुरभीच्या घरात सर्वजन रोज श्री गजानन विजय ग्रंथाचा एक अध्याय घेत होते. सुरभी तेव्हा सव्वा पाच वर्षांची होती. तिने तेव्हा आईकडे पारायण घेण्याचा हट्ट केला. तिला अक्षर ओळख नसल्यामुळे पारायण कसे करायचे ही अडचण होती. तिला विद्याताई पडवळ यांचे यु-ट्युबवरील अध्याय लावून देत. ती दररोज अध्याय ऐकत होती. वयाच्या साडेसातव्या वर्षी सुरभीला संपूर्ण २१ अध्याय मुखपाठ झाले. वयामुळे ती पूर्ण पारायण करत नव्हती. पण शक्य तेवढे पारायण करायची. तिला शेगावला पूर्ण पारायण सांगायचे होते. अलीकडेच पाच हजार गजाननभक्तांसमोर तिने शेगावला पहिल्यांदा पूर्ण पारायण सांगितले. इतक्या कमी वयात सुरभी अतिशय सफाईदारपणे पारायण सांगत असल्याचे पाहुन अनेकांना आश्चर्य वाटत होते. तिचे सर्वांनी कौतुकही केले.

आता ती चंद्रपूरकरांना पूर्ण पारायण सांगणार आहे. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील गजानन भक्तांना तिच्या पारायणाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे, अशी माहिती श्री गजानन गौरव गाथा समितीचे अध्यक्ष जयंत मामीडवार यांनी दिली. सुरभीचे चंद्रपूरशी नाते आहे. काँग्रेस नेते गजानन गावंडे यांच्या पुतणीची सुरभी ही मुलगी म्हणजे चंद्रपूरची नात आहे. ही बाब चंद्रपूरकरांच्या आनंदात भर घालणारी आहे. तसेच यावेळी गजानन महाराज यांचे भक्त सुनील देशपांडे यांचे ग्रंथावरील निरूपण होणार आहे. विशेष म्हणजे सुरभी ने शेगाव, नागपूर, कोल्हापूर अशा सहा ठिकाणी आतापर्यंत पारायण केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eight years old surabhi dhage will be reciting mukhodgat parayan to gajanan devotees at chandrapur rsj 74 dvr