गडचिरोली: जिल्हा हिवताप कार्यालयातून पाच लाख किमतीचे १८ मायक्रोस्कोप यंत्र चोरीस गेले होते. या घटनेला साडेतीन महिने उलटले, परंतु पोलिसांना अद्याप चोरट्याचा शोध घेता आला नाही. दुसरीकडे भांडारपालावरही कारवाई झाली नाही, त्यामुळे या भांडारपालाला कोण पाठिशी घालतयं, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्हा हिवताप कार्यालयाने एप्रिल महिन्यात मायक्रोस्कोप यंत्रांची खरेदी केली होती. साठा नोंदवहीत याची नोंद घेतली होती. २२ पैकी चार नग आरोग्य संस्थांना वितरित केले होते तर १८ नग भांडार विभागात ठेवले होते. दरम्यान, ऑगस्ट महिन्यात ते चोरीस गेले. ही बाब निदर्शनास आल्यावर गडचिरोली ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस अद्याप चोरापर्यंत पोहोचू शकले नाही.
हेही वाचा… वर्धा: जुन्या वैमनस्यातून कुख्यात गुंड ‘गज्या हंडी’ चा खून; मारेकऱ्यांना अटक
तथापि, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.पंकज हेमके यांनी या प्रकरणात भांडारपाल अशोक पवार यांच्यावर निष्काळजी व हलगर्जीचा ठपका ठेवत २१ सप्टेंबर २०२३ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली. याचा पवार यांनी खुलासा दिला. त्याचा अहवाल डॉ. हेमके यांनी उपसंचालकांकडे पाठवला, पण अशोक पवार यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे त्यांना वाचविण्यासाठी आरोग्य विभागात नेमकं कोण प्रतिष्ठा वापरतयं, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
यापूर्वीही झाली चोरी
यापूर्वीही मायक्रोस्कोप चोरी गेले होते. त्यानंतर भांडार शाखेत सुरक्षेबाबत प्रभावी उपाय आवश्यक होते, पण पुन्हा पाच लाखांचे मायक्रोस्कोप चोरीस गेल्याने खळबळ उडाली आहे. चोरीच्या घटनेनंतर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले, पण महागड्या यंत्रांच्या सुरक्षेबाबत एवढी हलगर्जी कशी काय, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
संबंधित भांडारपालाला निष्काळजीपणा केल्याने नोटीस बजावून खुलासा मागवला होता, त्याचा अहवाल उपसंचालकांकडे पाठवला आहे. कोणालाही पाठिशी घातलेले नाही, योग्य ती कार्यवाही सुरु आहे. – डॉ.पंकज हेमके, जिल्हा हिवताप अधिकारी