भारतात वंचित घटकातील विद्यार्थ्यांना आजही शिक्षणासाठी संघर्ष करावा लागतो. अशा विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची संधी ‘एकलव्य’ संस्थेच्या माध्यमातून मिळणार आहे. विशेष म्हणजे, हे सर्व मार्गदर्शन मोफत असून वंचित घटकातील असतानाही परिस्थितीवर मात करत उच्च शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांकडूनच मार्गदर्शन केले जाणार आहे. ‘एकलव्य’ने भविष्यात वंचित घटकातील एक हजार विद्यार्थी विदेशात उच्च शिक्षणासाठी पाठवण्याचे ध्येय ठेवले आहे.
हेही वाचा- ‘जी-२०’ आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी नागपूरचे ‘ब्रॅन्डिंग’ करणार
देशभरातील, वंचित समूहातील जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊ इच्छितात अशा विद्यार्थ्यांना ‘एकलव्य’ ही संस्था मार्गदर्शन करते. अशा विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घेण्यासाठी संस्थेतर्फे ‘एकलव्य ग्लोबल स्कॉलर्स’ हा कार्यक्रम राबवला जातो. या संस्थेचे संस्थापक राजू केंद्रे जे स्वतः पहिल्या पिढीतील शिक्षण घेत असलेले व्यक्ती असून त्यांना मागील वर्षी प्रतिष्ठित अशी ‘चेवेनिंग शिष्यवृत्ती’ मिळाल्याने लंडन येथे जाऊन शिक्षण घेण्याची संधी मिळाली होती. अशी संधी वंचित घटकातील विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी एकलव्य संस्थेने ‘ग्लोबल स्कॉलर्स प्रोग्रॅाम’ सुरू केला आहे. या कार्यक्रमातून येत्या दहा वर्षांत एक हजार विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी पाठवण्याचा ‘एकलव्य’चा मानस आहे.
हेही वाचा- नागपूर : निवृत्ती वेतनधारकांना आता डिजिटल जीवन प्रमाणपत्र
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त यंदा ‘एकलव्य ग्लोबल स्कॉलर्स प्रोग्रॅाम’ची सुरुवात करण्यात आली. तळागाळातील उपेक्षित समूहाच्या पहिल्या पिढीतील विद्यार्थ्यांना इंग्लंड आणि युरोपात मानव्यशास्त्र आणि सामाजिक विज्ञान, प्रसार माध्यमे आणि कायदा अशा विषयात पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी आणि पीएच.डी. साठी मार्गदर्शन सुरू केले आहे. पुढील काही वर्षांमध्ये एकलव्यतर्फे अमेरिका आणि इतर देशांमधील शिक्षणासाठी अर्ज करण्याबाबतचे मार्गदर्शन दिले जाणार आहे.
विदेशातील प्रवेशासाठी सर्व प्रकारचे मार्गदर्शन
‘एकलव्य ग्लोबल स्कॉलर्स’चे पहिले निवासी शिबीर जुलै २०२२मध्ये वर्धा येथे आयोजित केले गेले. बूटकॅम्प, ऑनलाईन कार्यशाळा आणि अनेक चर्चासत्रे याद्वारे परदेशातील विद्यापीठे आणि शिष्यवृत्तीसाठी लागणाऱ्या अर्जाचे मार्गदर्शन करणे, आयईएलटीएसचे प्रशिक्षण, व्हीजा काढण्यासाठी मदत करणे, विदेशी विद्यापीठातील प्रवेशासाठी लेखन करणे, लेटर्स ऑफ रिकमेंडेशन आदी मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात येते.
हेही वाचा- नागपूर:डाव्या ‘अभाविप’विरुद्ध अनेक उजव्या संघटना मैदानात!
यांचे मार्गदर्शन लाभणार…
शहरात नुकतेच ‘एकलव्य संस्थे’चे केंद्र सुरू झाले असून अशोकवन येथे ११ ते १३ नोव्हेंबरला निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात साठहून अधिक विद्यार्थी आणि ८ मार्गदर्शक सहभागी होणार आहेत. एकलव्य एका विद्यार्थ्याला एक मार्गदर्शक अशा पद्धतीने १८ राज्यातील १००हून अधिक विद्यार्थ्यांबरोबर काम करत आहे. जिथे ९० मार्गदर्शक मार्गदर्शन करत आहेत. शिबिरात अदिती प्रेमकुमार (ऑक्सफर्ड विद्यापीठ), अनिश गवांडे (कोलंबिया आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ), आशीर्वाद वाकडे (शिकागो विद्यापीठ), भीमाशंकर शेतकर(जर्मन चान्सलर फेलो), पवन कुमार श्रीराम (इरॅसमस मुंडस स्कॉलर), सौरभ वैती (कॉमनवेल्थ शेअर्ड स्कॉलर), सुमित सामोस (ऑक्सफर्ड विद्यापीठ) हे मार्गदर्शक म्हणून लाभणार आहेत.