गडचिरोली : अविकसित, नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोलीत उच्च शिक्षणाबद्दल प्रबोधनासह मार्गदर्शन करण्यासाठी राजू केंद्रे यांच्या एकलव्य फाउंडेशनने पुढाकार घेतला असून मागास, आदिवासी विद्यर्थ्यांसाठी ते विविध ठिकाणी कार्यशाळा घेत आहेत. त्यामुळे देशभरातील वंचित विद्यार्थ्यांसाठी प्रभावी कार्यशाळांच्या माध्यमातून उच्च शिक्षणाचे द्वार उघडे करणारा ‘एकलव्य पॅटर्न’ गडचिरोलीतील विद्यार्थ्यांसाठी उपयोगी ठरणार आहे.
राजू केंद्रे यांचे एकलव्य फाउंडेशन ग्रामीण व आदिवासी भागातील पहिल्या पिढीतील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळण्यासाठी काम करत आहेत. त्यांनी या कामासाठी ‘एकलव्य’ ही शैक्षणिक चळवळ सुरू केली आहे. महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकाला असलेल्या नक्षलग्रस्त गडचिरोलीत मूलभूत सुविधांची वानवा आहे. रस्त्यांचा अभाव, दळवळणाची अपुरी साधने यामुळे या भागातील मुलांचा उच्चशिक्षणातील टक्का खूप कमी आहे.
एकलव्यच्या टीमने भामरागडपासून ते चामोर्शीपर्यंत सध्या बारावीत शिक्षण घेत असलेल्या ६ महाविद्यालयांतील ६५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना एकदिवसीय कार्यशाळेच्या माध्यमातून विज्ञान, कला, मीडिया, तंत्रज्ञान अशा शैक्षणिक करिअरच्या शेकडो वाटांची जाणीव करून दिली आहे. येत्या काळात यापैकी निवडक विद्यार्थ्यांना निवासी कार्यशाळा घेऊन अधिकचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे. मागील तीन वर्षांपासून गडचिरोलीमध्ये एकलव्य शैक्षणिक कार्यशाळा घेत असून या माध्यमातून आयआयटी, जेएनयू, टीस आणि विविध केंद्रीय विद्यापीठात आपले विद्यार्थी प्रतिनिधित्व करीत आहेत. या कार्यशाळांसाठी संकल्प फाऊंडेशनचे पंकज नरुले, चेतना लाटकर, इतिहास मेश्राम व एकलव्य टीम मेहनत घेत आहे. भामरागड येथील हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पात नुकतीच ही कार्यशाळा झाली, यास विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
हेही वाचा – थंडीची चाहूल लागताच राज्यात विजेची मागणी घसरली; कोराडी प्रकल्पात सर्वाधिक वीज निर्मिती
सध्याच्या घडीला उच्च शिक्षणासाठी लागणारी पात्रता आणि कौशल्य ग्रामीण, दुर्गम भागातील मुलांना समजावणे खूप आवश्यक आहे. त्यांना रिअल लाईफ स्टोरीज सांगून मुख्य प्रवाहातील शिक्षण घेण्यासाठी मदतीचा हात देण्यासाठी एकलव्य संस्था काम करत आहे. त्यासाठीच अशा विद्यार्थ्यांना एकत्रित करुन कार्यशाळा घेतली जात आहे. – राजू केंद्रे, संस्थापक एकलव्य फाउंडेशन