नागपूर : राज्यातील बहुचर्चित आर्किटेक्ट एकनाथ निमगडे हत्याकांडाचा तपास सात वर्षांनंतरही निष्कर्षहीनच आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला (सीबीआय) आरोपींविरुद्ध गुन्हे सिद्ध होतील, अशी ठोस ‘लिंक’ अद्याप सापडली नाही. त्यामुळे सीबीआय यासंदर्भात सक्षम न्यायालयात अहवाल दाखल करण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती ‘सीबीआय’ने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याप्रकरणी न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती वाल्मीकी मेनेझेस यांच्यासमक्ष सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने ही माहिती ‘रेकॉर्ड’वर घेऊन याविषयी आवश्यक आदेश देण्याकरिता येत्या २६ ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी निश्चित केली आहे.

हेही वाचा – पाहिजेत स्टंटबाज, लाचार, कपटी उमेदवार! सोशल मीडियावर कंत्राटी आमदार भरतीच्या जाहिरातीचा धुमाकूळ

हेही वाचा – बुकी सोंटू जैन करतोय पोलिसांची दिशाभूल! ऑनलाईन क्रिकेट ‘गेमिंग अ‍ॅप’ प्रकरण

ही घटना ६ सप्टेंबर २०१६ रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास सेंट्रल एव्हेन्यूवरील लाल इमली चौकात घडली होती. सकाळी फिरायला गेल्यानंतर घरी परतत असताना निमगडे यांची बंदुकीच्या पाच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. वर्धा मार्गावरील विमानतळाजवळील साडेपाच एकर जमिनीच्या वादातून निमगडे यांची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे. त्यामुळे निमगडे हत्याकांडाला राजकीय किनार लागली आहे. राजकीय दबावातूनच निमगडे हत्याकांडाचा तपासात गती येत नसल्याची तक्रार निमगडे यांच्या मुलीने केली होती. या प्रकरणाचा तपास वेगात पूर्ण व्हावा आणि आरोपींना कडक शिक्षा व्हावी, याकरिता एकनाथ निमगडे यांचा मुलगा अनुपम निमगडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दरम्यान सीबीआयने या हत्याकांडाचा तपास योग्य पद्धतीने केला नाही, असा त्यांचा आरोप आहे. हत्याकांडाचा सखोल तपास करण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी याचिकेत केली आहे. सीबीआयतर्फे अ‍ॅड. मुग्धा चांदूरकर यांनी बाजू मांडली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath nimgade murder case report will be submitted by cbi in court adk 83 ssb