यवतमाळ – विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला दिलेल्या जनाधारानिमित्त मतदारांचे आभार मानण्यासाठी शिवसेना पक्षनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आभार यात्रा काढली आहे. विधानसभा निवडणुकीस चार महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतर ही यात्रा काढण्यात आल्याने ती चर्चेत आहे.  यात्रा सलग फिरत नसल्याने या यात्रेतून प्रतिस्पर्धी शिवसेना (उबाठा)ला धक्का देत ‘ऑपरेशन टायगर’ मोहीम राबविण्याचा हेत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

एकनाथ शिंदे हे  गुरूवारी सायंकाळी ६ वाजता यवतमाळ येथील पोस्टल मैदानात जाहीर सभेतून मतदारांचे आभार मानणार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर ते पहिल्यांदाच यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर येत असल्याने शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. सभेस जवळपास ५० हजारांवर नागरिक उपस्थित राहतील हे गृहीत धरून शिवसेनेने नियोजन केले आहे. एसटी बसेस, खासगी वाहनांमधून नागरिक सभास्थही पोहोचत आहेत.

भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या‍ निवडणुका  आहेत.  शिवसेनेने या कार्यक्रमातून शक्तीप्रदर्शनाची तयारी चालविल्याची चर्चा आहे. महायुती स्थानिक स्वराज्यसंस्थांच्या ‍निवडणुका एकत्र लढणार की, स्वबळावर यावर अद्याप निर्णय झाला नाही. मात्र शिवसेनेने जिल्ह्यात आपली पकड अधिक मजबूत करण्यासाठी संघटनात्मक बांधणीवर भर दिला आहे.  

शिंदे यांच्या उपस्थितीतील आभार यात्रा त्याचीच तयारी असल्याची चर्चा आहे. शिवाय ऑपरेशन टायगर मोहिमेंतर्गत या कार्यक्रमात शिवसेना (उबाठा)चे काही महत्वाचे पदाधिकारी शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश घेणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, बाजार समिती अशा ग्रामीण यंत्रणेवर पकड असलेले आठ ते दहा पदाधिकारी  शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत येणार असल्याने पक्षाची ग्रामीण भागात ताकद वाढेल, असा विश्वास पक्षात व्यक्त होत आहे.

यवतमाळ, पुसद, वणी, उमरखेड भागातील हे पदाधिकारी सध्या शिवसेना उबाठातील कार्यपद्धतीला त्रासल्याने त्यांनी घरवापसीचा निर्णय घेतल्याचे एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले. लोकसभा निवडणुकीत शिवसेना (उबाठा) दिलेले आश्वासन अद्यापही पूर्ण केले नाही. पक्षाचे स्थानिक खासदार कधीच भेटत नाही. कार्यकर्त्यांना वेळ देत नाहीत, अशा कुरबुरी आता शिवसेना (उबाठा) मध्ये सुरू झाल्याने भविष्यात अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेना (शिंदे) पक्षात येणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.