वाशीम : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्याअनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची ताकद दाखविण्यासाठी राज्यात शिवसंकल्प अभियानाची घोषणा केली आहे. या अभियानाची सुरवात ६ जानेवारी पासून होत असून १३ व २० जानेवारी रोजी पश्चिम विदर्भात शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.
हेही वाचा >>> ट्रक चालकांच्या संपाचा शाळांना फटका; स्कुल बसचे वाहक नसल्याने…
आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी व पक्षात नवचैतन्य प्रस्थापित करण्यासाठी शिवसेना शिंदे गट शिवसंकल्प अभियानाच्या माध्यमातून मैदानात उतरत आहे. राज्यात महायुती आणि मविआ च्यावतीने मोर्चेबांधणीवर भर दिला जात आहे. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसंकल्प अभियानची घोषणा केली असून या अभियानची सुरवात पहिल्या टप्यात ६ जानेवारीपासून सुरु होत असून पश्चिम विदर्भात हे अभियान १३ जानेवारी पासून राबविण्यात येत आहे. हे अभियान १३ जानेवारी रोजी अमरावती आणि बुलडाणा तर २० जानेवारी रोजी यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघात आयोजित करण्यात आले आहे. या दरम्यान भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन देखील करण्यात आले आहे. शिवसंकल्प अभियान ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राबविण्यात येत असून या अभियानच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहिर सभा देखील होणार असून हे अभियान यशस्वी करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाकडून नियोजन केले जात आहे. सरकारने घेतलेले निर्णय, विकासात्मक कामे व जनकल्याणकारी योजना घराघरात पोहचवून आगामी काळात होणार असलेल्या लोकसभा निवडणुका ताकतीने लढण्याचा निर्धार व्यक्त केला जात आहे. शिवसंकल्प अभियान पश्चिम विदर्भात किती प्रभावी ठरणार, हे लवकरच समोर येणार असले तरी कार्यकर्त्यांमध्ये मात्र उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.