बुलढाणा : आमच्यावर बंडाळी आणि दगा दिल्याचा आरोप करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत हिंदुत्ववादी विचार आणि शिवरायांची भूमी असलेल्या महाराष्ट्र राज्यातील साडेबारा कोटी जनतेचा विश्वासघात केला आहे. जनतेच्या मनातील युती सरकार न आणता काँग्रेससोबत गेले. त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्य काँग्रेसच्या दावणीला नेऊन बांधला. आम्ही धनुष्य विरोधकांच्या तावडीतून सोडवून बाळासाहेबांची शिवसेना जिवंत ठेवल्याचे घणाघाती प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
आम्ही धनुष्य चोरल्याचा ते आरोप करतात, पण धनुष्य चोरायला ते काही खेळण आहे का? असा उपरोधिक सवालही त्यांनी केला. याउलट त्यांनी आमचा वचननामा चोरल्याचा आरोप करून लाडक्या बहिणींना आता एकविसशे रुपये देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
हेही वाचा – नागपुरात डासांचा उद्रेक…अन् काँग्रेस उमेदवार प्रचार सोडून फाॅगिंग…
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे महायुतीचे मेहकर मतदारसंघातील उमेदवार संजय रायमूलकर यांच्या प्रचारार्थ आज मंगळवारी, १२ नोव्हेंबर रोजी आयोजित जंगी प्रचार सभेत ते बोलत होते. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमूलकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांनाच लक्ष्य करीत काँग्रेस व राष्ट्रवादी नेते शरद पवार यांच्यावर टीका करण्याचे टाळले. तसेच आपल्यावर ठाकरे गटाकडून होणाऱ्या टीका आणि आरोपांना प्रत्युत्तर दिले. सत्तेसाठी ते काँग्रेस सोबत गेले अति झाले, घुसमट वाढली तेव्हाच आम्ही उठाव केला. पन्नास आमदार आणि तेरा खासदार आमच्या सोबत आले. आम्ही बाळासाहेबांचा विचार आणि खरी शिवसेना जिवंत ठेवली. लोकशाहीत बहुमताला महत्व आहे. यामुळे निवडणूक आयोग आणि न्यायालयाने आमच्या बाजूने कौल दिला. यानंतर झालेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत आमचा पक्ष दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला.
आम्ही कोट्यवधी रुपयांची विकास कामे केली, म्हणून आम्ही जनतेचे लाडके ठरलो. त्यांच्या काळात मेट्रो, कार शेड, कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग आदी प्रकल्प अडविण्याचेच काम झाले आम्ही ते पूर्ण करुन दाखविले. यांच्या अडीच वर्षांच्या काळात मेहकर मतदारसंघात ४० कोटीचा तर आमच्या कार्यकाळात ४५०० कोटींचा विकास निधी मिळाला. ऑनलाईन पद्धतीने कारभार आणि जनतेला सोबत घेऊन काम करणे हा यातील फरक आहे. लोकसभेत आम्ही लढविलेल्या १३ पैकी ७ जागा जिंकून बाजी मारली. त्यामुळे खरी शिवसेना आमची हे सिद्ध झाल्याचा खणखणीत दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी बोलून दाखविला.
मतांची सूज आणि लाडकी बहीण
याउलट ठाकरे यांची स्थिती आहे. जागाही घटल्या, जनाधार देखील घटला अशी त्यांची गत आहे. जी जादाची मते (मतदान) आहे ती काँग्रेसची आहे. ते खरे मतदान नसून मतांची सूज असल्याचे सांगून ‘सूज’ कधी कायम राहत नाही, ती कमी होतेच असा मार्मिक टोला त्यांनी यावेळी लगावला. आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा यांनी खिल्ली उडविली, टिंगल केली, माय बहिणींची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही ते करुन दाखविले. आता यांनी आमचा जाहीरनामा चोरून महालक्ष्मी योजना राबविण्याचे जाहीर केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. लोकसभेत आरक्षण, संविधानवरून फेक नरेटिव्ह पसरविले, आताही विरोधकांचा तोच प्रयत्न असल्याचा आरोप मुख्यमंत्री शिंदे यांनी सभेत केला.
हेही वाचा – मुख्यमंत्री म्हणतात, मी शंभरवेळा तुरूंगात जाण्यास तयार…कारण…
विविध प्रकल्पांची घोषणा
मेहकरमधील प्रचार सभेत उद्धव ठाकरे यांनाच लक्ष्य करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिंदखेडराजा येथे घेतलेल्या प्रचारसभेत विविध प्रकल्पांची घोषणा केली. सिंदखेडराजात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारणार असून मराठवाड्यातील जायकवाडी प्रकल्पाच्या धर्तीवर सिंदखेडराजा मतदारसंघमधील खडकपूर्णा प्रकल्पाजवळ पर्यटन केंद्र उभारणार अशी घोषणा शिंदे यांनी केली. सिंदखेडराजा मतदारसंघात महायुतीचा खरा उमेदवार शशिकांत खेडेकर ( शिंदे गट) हेच असल्याचे सांगून त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राजेंद्र शिंगणे यांच्यावर नाव न घेता टीकास्त्र सोडले. जाऊ तिथं सत्तेचं लोणी खाऊ या पद्धतीने त्यांनी अजित पवारांकडून निधी घेतला व आता शरद पवार यांच्याकडे गेले आहे.