नागपूर : माजी राज्यमंत्री बच्चू कडू व आमदार रवी राणा यांच्यातील वाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर मिटल्यात जमा आहे, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हणाले. ते सोमवारी नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. रवी राणा यांनी गुवाहाटीला गेलेल्या आमदारांनी पैसे घेतल्याचा आरोप केला होता. त्यामुळे बच्चू कडू संतप्त झाले आणि पैसे घेतल्याचा पुरावा १ नोव्हेंबरपर्यंत देण्याचे आव्हान राणा यांना दिले होते. एवढेच नव्हेतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना यात हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती.
हेही वाचा >>> नागपूर : शिक्षक आमदार निवडणूकीत काँग्रेस शब्द पाळणार का?
यासंदर्भात मुनंगटीवार म्हणाले, बच्चू कडू आणि राणा यांच्यात काहीतरी मतभेद झाल्यामुळे त्यांच्यात वाद झाला होता. परंतु, आता दोघांनी सामंजस्य दाखवले आहे. त्यांच्या भूमिकचे मी स्वागत करतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयमाने हे प्रकरण हाताळले आणि त्यानंतर आमदार रवी राणा यांनी दिलगिरी व्यक्त करीत आपले शब्द मागे घेतले, तर आमदार बच्चू कडू यांनीही आपले शब्द मागे घेतले. त्याबद्दल त्यांचे आभार, असे मुनगंटीवार म्हणाले.