बुलढाणा : निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवले. हे त्यांच्याच चुकीचा परिणाम आहे. आता ‘त्यांना’ या घोडचुकीचे परिणाम भोगावेच लागतील, अशी बेधडक प्रतिक्रिया शिंदे गटाचे आक्रमक आमदार संजय गायकवाड यांनी दिली. त्यांनी नाव न घेता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व वरिष्ठ नेत्यांना टोले लगावले. शिवसेनेला आई म्हणता अन् काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला बांधता, हे कितपत योग्य आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
धनुष्यबाण चिन्ह तूर्तास गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर बोलताना आ. गायकवाड म्हणाले, आमच्यासह ४० आमदारांनी बंड केले. त्यांची मनधरणी केली असती, चर्चा केली असती तर आज ही वेळ आली नसती. आमदार, खासदार गेले अन् आता घराण्यातील सून, मुलगा, विश्वासू सेवक थापादेखील शिंदे गटात आला. आमच्यावर खोक्यांचे आरोप केले. मग या मंडळींनीदेखील खोके घेतले काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
हेही वाचा : भंडारा : गौण खनिज तस्करांवर कारवाईचा धडाका ; १ कोटी ६२ लाखांचा मुद्देमाल जप्त
आयोगाचा निर्णय कायद्याच्या चौकटीतच
निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतला तो कायद्याला अनुसरूनच घेतला, असा दावा आ. गायकवाड यांनी केला. यासाठी ‘ते’च जबाबदार असल्याने त्याचे परिणाम त्यांनाच भोगावे लागतील, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख न करता लगावला.