नागपूर : माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीच्या नवीन सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले असून ते देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये दुसऱ्या क्रमाकांचे नेते राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. हिवाळी अधिवेशनाची तयारी लागलेल्या प्रशासनाने एकनाथ शिंदे यांना नागपुरातील देवगिरी शासकीय निवास दिले आहे.
फडणवीस सरकारमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार असे दोनउपमुख्यमंत्री आहेत. भाजप, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार ) अजून खाते वाटपाबाबत अंतिम निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे सत्तास्थापनेला चार दिवस झालेतरी असली दोन्ही उपमुख्यमंत्री बिनखात्याचे मंत्री म्हणून कार्यरत आहेत. विधानमंडळ हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, असे खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केेले आहे. तत्पूर्वी एकनाथ शिंदे यांना नागपुरातील देवगिरी शासकीय निवासस्थान देऊन शिंदे हे सरकारमध्ये दुसऱ्या क्रमाकांचे नेते असल्याचे संकेत देण्यात आले आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ‘विजयगड’ हे शासकीय निवासस्थान देण्यात आले आहे.
हेही वाचा…त्वचेवरील डागामुळे पोलीस नोकरीत अपात्र ठरविले, उच्च न्यायालयात प्रकरण…
विधानसभा सभागृहातील आसन व्यवस्थेनुसार फडणवीस यांच्या बाजूला एकनाथ शिंदे यांना स्थान देण्यात आले आहे. तिसऱ्या क्रमाकांच्या बाकावर अजित पवार यांची व्यवस्था आहे. त्यामुळे आता शिंदे हेच सरकारमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे नेते असल्याचे स्पष्ट झाले आहे. नागपुरातील देवगिरी शासकीय निवासस्थान मंत्रिमंडळातील क्रमांक दोनच्या मंत्र्याला देण्यात येतो. देवगिरी येथे देवेंद्र फडवीस यांचे होते. ते काढून एकनाथ शिंदे यांचा नामफलक लावण्यात आले आहे. तसेच फडणवीस यांच्या नावाची फाटी मुख्यमंत्री म्हणून रामगिरीवर लावण्यात आली आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विजयगड निवासस्थान कायम ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा…रेल्वेचे वेळापत्रक पुन्हा विस्कळीत; गोंदियातील प्रवाशांमध्ये नाराजी
विरोधीपक्षा नेत्याचे निवासस्थान कोणाला?
विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले आहे. तर महाविकास आघाडीची वाताहत झाली आहे. महाविकास आघाडीला ५१ जागा मिळाल्या आहेत. यात शिवसेना (ठाकरे) २०, काँग्रेस १६ आणि राष्ट्रवादीला (शरद पवार) १० जागा आहेत. विरोधीपक्षनेते पदासाठी किमान १० टक्के जागा हव्या असतात. २८८ जागांच्या सभागृहात विरोधीपक्ष नेतेपदासाठी २९ आमदार असणे आवश्यक आहे किंवा कोणाला विरोधीपक्ष नेते पद द्यावे हे सरकारवर अवलंबून असते.
राज शिष्टाचारानुसार कॉटेज क्रमांक २२ विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्याकडे राहणार असते. येथे अंबादास दानवे हिवाळी अधिवेशनादरम्यान राहतील. मात्र, विधानसभेतील विरोधी पक्षनेत्यासाठी राखीव असलेल्या कॉटेज क्रमांक २३ बाबत अद्याप निर्णय झालेला नाही. यासंदर्भातील समिती निर्णय घेणार आहे.