लोकसत्ता टीम
अकोला : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीच्या महायुतीला स्पष्ट बहुमत प्राप्त झाले. त्यानंतर आता मुख्यमंत्री पदावरून राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहेत. त्यातच अकोला शहरातील प्रमुख चौकांमध्ये झळकलेल्या फलकांनी लक्ष वेधून घेतले आहे. ‘मुख्यमंत्री एकच एकनाथराव शिंदे साहेब’ असे नमूद असलेले छायाचित्रासह फलक शहरामध्ये ठिकठिकाणी लावण्यात आले. शिवसेनेचे राज्य समन्वयक रामेश्वर पवळ यांनी हे फलक लावले आहेत. या फलकावरून चांगलीच चर्चा रंगली आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीचा अभूतपूर्व निकाल लागला. १३२ जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. शिवसेना ५७ व राष्ट्रवादीने ४१ जागांवर विजय मिळवला. मतदारांनी महायुतीच्या बाजुने स्पष्ट कौल दिला. महाविकास आघाडीची घोर निराशा झाली. शिवसेना ठाकरे गटाला २०, काँग्रेस १६ व राष्ट्रवादी शरद पवार गटाला १० जागांवर समाधान मानावे लागले. राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता स्थापन होईल, हे निश्चित आहे. आता सर्वांना मुख्यमंत्री पदावर कुणाला संधी मिळणार याची प्रचंड उत्सुकता लागली. या पार्श्वभूमीवरच अकोल्यातील फलक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत.
शिवसेनेचे प्रदेश समन्वयक रामेश्वर पवळ हे मूळचे अकोल्यातील आहेत. त्यांनी सरकार स्थापन होण्याच्या पूर्वीच शहरातील चौकाचौकांमध्ये फलक झळकवले. त्या फलकावर ‘मुख्यमंत्री एकच एकनाथराव शिंदे साहेब’ असे नमूद केले. शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, शिवसेना नेते स्व. आनंद दिघे व एकनाथ शिंदे यांच्या छायाचित्रासह पक्षाचे चिन्ह फलकावर आहे.
या संदर्भात रामेश्वर पवळ म्हणाले, ‘राज्यातील मतदार महायुतीलाच प्रचंड बहुमत देतील याचा विश्वास होता. निकालात ते सत्यात उतरले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिशय उत्तमरित्या महाराष्ट्राचा कारभार सांभाळल्याचा प्रत्यय महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना आला आहे. सर्व घटकांना त्यांनी न्याय दिला. जनमानसात मिसळणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे. लाडकी बहीणसह अनेक महत्त्वाकांक्षी योजनांची मुहूर्तमेढ एकनाथ शिंदे यांनी रोवली. त्याचे कोट्यवधी लाभार्थी आहेत. त्याचाच मोठा परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसून आला. शिवसेना, भाजपसह महायुतीला मोठे यश मिळाले. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकच, ते म्हणजे एकनाथ शिंदे राहतील. मुख्यमंत्री पदासाठी महायुतील सर्व वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यावरच पूर्ण विश्वास दाखवतील. याची खात्री आहे. त्यामुळे शहरभर फलक लावले आहेत. या फलकांवर भाजप नेत्यांंची काय प्रतिक्रिया येते हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.,