शिंदे गटाने मुंबई महापालिकेतील पक्ष कार्यालयाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. संघ कार्यालयातून ते बाहेर पडले असतील तर सरसंघचालक मोहन भागवत यांनी काळजी घ्यावी. कुठं लिंबू-टाचण्या पडल्या का?, याचा शोध घ्यावा. कारण, या मिंधे गटाची नजर बुभुक्षित आहे. यांनी वडिल नेते, पक्ष, कार्यालय चोरलं आहे, असा टोला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिदेंना लगावला होता. याला मुख्यमंत्री शिंदेंनी विधानसभेत बोलताना प्रत्युत्तर दिलं आहे.
“एक माणूस चुकू शकतो, दोन, पाच, दहाजण चुकू शकतात. पण, ५० लोक चुकीचं आणि मी बरोबर, असं कसं काय होऊ शकतं,” असा टोला उद्धव ठाकरेंना लगावत एकनाथ शिंदे म्हणाले, “उपमुख्यमंत्री आणि मी काही श्रद्धास्थळांना भेट दिली. यामध्ये राजकारण करण्याची संधी काहीजणांनी सोडली नाही. प्रबोधनकार ठाकरेंनी कर्म-कांड करणाऱ्यांवर सातत्याने प्रहार केले. अंधश्रद्धेच्या विरुद्ध लढले, अनिष्ट चालीरीतींना विरोध केला. त्याच प्रबोधकारांचे वारस म्हणणारे लिंबू-टिंबूची भाषा करु लागले.”
“मुख्यमंत्री झाल्यावर वर्षा बंगल्यावर नंतर गेलो. पहिलं बोललं काय काय आहे, बगा तिकडं. तर, वर्षावर पाटीभर लिंबू सापडली. लिंबू-टिंबूची भाषा करणाऱ्यांनी बाळासाहेबांच्या बरोबर प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारांना तिलांजली दिली. दुसऱ्यांवर टीका करताना स्वत:च आत्मपरिक्षण आणि आत्मचिंतन करा. सत्याला समोरं जावे. या सगळ्याबाबतीत चूक कोणाची आहे, हे स्वत:ला विचारा,” असा सल्लाही एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दिला.