नागपूर: सी.-२० परिषदेसाठी नागपूर विजेच्या दिव्यांनी उजळून निघत असताना ग्रामीण भागात मात्र नापिकीआणि अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक हानी मुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आंधार निर्माण झाला आहे. नागपूर नजीकच्या कोंढळाजवळील पांजरा(काटे) येथील वृद्ध शेतकऱ्याने सततची नापिकी, पावसामुळे पीक हानीमुळे शातातील विहिरीत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
पांजरा काटे येथील शेतकरी विद्याधर पांडूरंग सरोदे (६३) सततच्या नापिकीमुळे नैराश्यात गेले होते. त्यांच्यावर कर्जाचा बोझाही वाढला होता. कर्ज कसे फेडावे या विवंचनेत ते होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा,असा प्रश्न त्यांच्यापुढे होता. याबाबत त्यांनी पत्नीकडे बोलूनही दाखवले होते. पत्नी रंजनाबाईने त्यांना धीरही दिला होता. २० मार्चला सकाळी १०वाजता विद्याधर शेतीवर जाऊन येतो असे सांगून घराबाहेर पडले. दुपारी १२वाजे पर्यंत परत आले नाही म्हणून त्यांचा कुटुंबियांनी शोध घेतला. शेतातील विहीरीलगत त्यांच्या चपला सापडल्या. विहीरत शोध घेतला असता तेथे विद्याधरचा मृतदेह सापडला. याबाबबत कोंढाळी पोलीस ठाण्यात विद्याधर यांचा मुलगा कृष्ण सरोदे यांनी तक्रार केली. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून पार्थिव विच्छेदनकाकरिता काटोल ग्रामीण रुग्णालयात पाठविले.