चंद्रपूर : ब्रम्हपुरी तालुक्यातील आवळगांव बिटात आवळगांव येथील वृद्ध सकाळी मोहफुल वेचण्याकरीता जंगलात गेले होते. तेथे दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला करून त्यांना ठार केल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. मृताचे नाव मनोहर सखाराम चौधरी (रा.आवळगांव) आहे.

मनोहर चौधरी पोटाची खळगी भरण्याकरीता हंगामी मोहफुल वेचुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. त्यासाठी आवळगांव बिटातील कक्ष क्र.११३८ मध्ये मोहफुल वेचण्याकरीता सकाळी जंगलात एकटाच गेले असता वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ठार केले. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी आर.डी.शेन्डे व मेंडकी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या परिसरात वाघांची दहशत असुन भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. वनविभागाने गस्त वाढवुन वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करीत आहे.

मनोहर यांच्या पश्चात पत्नी व मुलगा-मुलगी आहे. दक्षिण वनपरिक्षेत्र अधिकारी आर.डी.शेन्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करून शव उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यांच्या कुटुंबाला तातडीची मदत म्हणून पन्नास हजार रूपये देण्यात आले आहे.