बुलढाणा : महागाईने कळस गाठला असताना एका घरगुती गॅस सिलिंडर इतकी पेन्शन मिळणाऱ्या वयोवृद्ध ईपीएस -९५ पेन्शन धारकांना आज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची पाळी केंद्र शासनाने आणली. हलाखीचे जीवन जगणाऱ्या या वयोवृद्धांनी आज आपल्या परिवारासह रास्ता रोको आंदोलन केले. त्यांची दखल घ्यायला ना नेते आले ना प्रशासन. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत नंतर सोडून दिले.
हेही वाचा >>> नागपूर : ‘एच ३ एन २’ग्रस्त रुग्णाच्या मृत्यूला इतर आजार कारणीभूत; मृत्यू अंकेक्षण समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब
स्थानिक जयस्तंभ चौकात दुपारी हे आंदोलन करण्यात आले. शेकडोंच्या संख्येतील या निवृत्तिवेतन धारकांनी रस्त्यावर ठिय्या न मांडता ते चक्क आडवे झाले. ईपीएस- ९५ राष्ट्रीय आंदोलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष नौदल कमांडर (निवृत्त) अशोक राऊत, राष्ट्रीय महासचिव वीरेंद्रसिंह राजावत यांच्या मार्गदर्शनाखाली सत्तरी गाठलेल्या या वृद्धांनी हे आंदोलन केले. पोलिसांनी सुटका केल्यावर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यापूर्वी जिजामाता संकुल नजीकच्या उपोषण मंडपातून मोर्चा काढून आंदोलक जयस्तंभ चौकात पोहोचले. ठिय्या न मांडता शेकडो वृद्ध रस्त्यावर आडवे झाले. यामुळे बुलढाणा मलकापूर राज्य मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली. नंतर बुलढाणा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत सोडून दिले.
किमान ७५०० रुपये पेन्शन मिळावी
सध्या महागाईने कळस गाठला आहे. अन्नधान्यापासून औषधांचे दर सामन्यांच्या आवाक्याबाहेर झाले. खासगी रुग्णालयाचे उपचार अशक्यच म्हणावे असे आहे. यामुळे एका घरगुती गॅस इतकी पेन्शन मिळणारे ईपीएस पेन्शनधारक कसे जीवन जगतात हा प्रश्न आहे. त्यामुळे किमान ७५०० रुपये पेन्शन, महागाई भत्ता, मोफत वैधकीय सुविधा या मागणीसाठी आजचे आंदोलन करण्यात आले. अर्थात केंद्र शासनाच्या दुर्लक्षामुळे त्यांना उतारवयात रस्त्यावर उतरण्यास भाग पाडण्यात आले.