लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वर्धा : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत काही दिवसांपूरतीच आहे. राष्ट्रीय व राज्य दर्जा असलेल्या पक्षांनी अद्याप आपले सर्व उमेदवार जाहीर केले नसले तरी अपक्ष उमेदवार मोठ्या संख्येत पुढे आल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. जिल्ह्यातील चार विधानसभा क्षेत्रात तसेच चित्र आहे. चारशेवर अर्ज गेले आहेत. २९ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजतापर्यंत अर्ज दाखल करणे, ३० रोजी अर्ज छाननी व ४ नोव्हेंबर रोजी अर्ज परत घेण्याची मुदत आहे.

राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षाच्या उमेदवारास ‘ए बी फॉर्म’ मिळाल्यानंतर कमळ, पंजा, हत्ती, विळा, हातोडा, तारा, पुस्तक, ट्रेन, झाडू, धनुष्यबान, मशाल, घड्याळ व तुतारी या ११ चिन्हांचे वाटप केल्या जाईल. मजेची बाबा म्हणजे, अपक्ष उमेदवारांसाठी तब्बल १९० चिन्हे निवडणूक आयोगाने तयार ठेवली आहेत. ती मजेशीर अशीच आहे. त्यात पंच मशीन, टॉर्च, खाट, टेबल, पेंचीस, दुर्बीण, आलमारी, बंदूक, गॅस सिलेंडर, जहाज, झुला, स्विच बटण, चाळणी, टिफिन, ऑटो, सेब, रेडिओ, इस्त्री, ब्रश, शार्पणर, रिंग, चप्पल, लिफाफा, चम्मच, कढई, पाना, पतंग, काठी, पर्स, कुकर व अशीच अनेक चिन्हे आहेत.

आणखी वाचा-प्रिया फुकेंविरुद्ध अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज

वर्धा मतदारसंघात ‘क’ आद्यक्षराने सुरुवात होणाऱ्या चिन्हाचा विजयी इतिहास सांगितल्या जातो. दिग्गज प्रमोदबाबू शेंडे यांचा पाडाव करण्यासाठी सर्व विरोधक एकत्र झाले होते. तेव्हा ‘कोंबडा’ चिन्हावर माणिकराव सबाने उभे झाले. ‘कोंबडा’ चांगलाच आरवला. सबाने विजयी झाले होते. पुढे नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीत शेंडे कुटुंबातील सुनेविरोधात सुनीता इथापे या ‘कपबशी’ चिन्हावार उभ्या झाल्या. त्यांनी दणदणीत विजय प्राप्त केला होता. त्यानंतर ‘क’ नावाचे चिन्ह अपक्ष उमेदवारास शुभ, अशी मानसिकता झाली.

शेखर शेंडे यांच्या विरोधात अपक्ष म्हणून सहकार नेते प्रा. सुरेश देशमुख हे उभे झाले. त्यांना ‘क’ अक्षरावरून सुरू होणारे चिन्ह घ्यावे, असा आग्रह झाला. त्यांना ‘कुकर’ चिन्ह मिळाले. चूरशीच्या लढतीत प्रा. देशमुख विजयी झाले होते. दुसऱ्या एका निवडणुकीत हिंगणघाट येथून अपक्ष लढणाऱ्या उमेदवाराने ‘कुकर’ चिन्ह घेतले व चांगल्या कंपनीच्या ‘कुकर’चे मोठ्या प्रमाणात वाटप केले होते. चर्चा चांगलीच झाली मात्र विजयाची शिट्टी वाजू शकली नव्हती.

आणखी वाचा-कॉंग्रेसच्या दुसऱ्या यादीत नागपूर दक्षिणमधून गिरीश पांडव, कामठीतून सुरेश भोयर, सावनेर मध्ये केदार यांच्या पत्नी रिंगणात

या चिन्हांत ‘सिलेंडर’ चिन्ह चांगलेच लोकप्रिय असल्याचे दिसून आले, तर ‘खाट’ चिन्ह कोणालाच नको असते. मात्र एका अपक्ष उमेदवारास ‘खाट’ चिन्ह मिळाले आणि त्याची हसू हसू चर्चा झाल्याचे दिसून आले होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election 2024 fun of election symbols pmd 64 mrj