नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचा प्रचारतोफा सोमवारी (१९ नोव्हेंबर) संध्याकाळी ६ वाजता थंडावणार आहे. त्यानंतर समाजमाध्यमांवर निवडणूकीचा प्रचार करणारी पोस्ट टाकल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती नागपुरचे जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपुरातील नियोजन भवनमध्ये सोमवारी झालेल्या पत्रपरिषदेत ते बोलत होते. प्रचाराच्या मुदतीनंतर कोणत्याही उमेदवाराला वयक्तिक, पक्षातर्फे वा समाज माध्यमाद्वारे प्रचार करता येत नाही. परंतु कुणी प्रचार करतांना आढळल्यास दोषींवर नियमानुसार कडक कारवाई केली जाईल. प्रशासनाची नागपूर जिल्ह्यातील सगळ्याच संवेदनशिल व असंवेदनशिल भागांवर नजर आहे.

हेही वाचा…दक्षिण नागपूरमध्ये भाजप काँग्रेसला समानसंधी

जिल्ह्यातील सगळ्याच मतदारसंघांमध्ये पोलीस यंत्रणासह विविध यंत्रणेच्या माध्यमातून लहान- मोठ्या सर्वच घडामोडींवरही लक्ष ठेवली जाईल. या काळात उमेदवारांना प्रचारासाठी लहान- सहान बैठकीही घेता येत नाही. परंतु बैठक घेतल्याचे स्पष्ट झाल्यास दोषींवर कारवाई केली जाईल. प्रशासनाकडून राज्याच्या सिमेवरील तपासणी नाक्यांवर गस्त वाढवण्यासह सुरक्षा यंत्रणेकडून संशयास्पद वाहनांची तपासणी सुरू आहे.

मंगळवारी (१९ नोव्हेंबर) सकाळपासून जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांवर ईव्हीएमसह इतरही निवडणूकीशी संबंधित यंत्रणा पाठवली जाणार आहे. त्याबाबतची तयारी पूर्ण झाली आहे. सोबत अधिकारी, उमेदवारांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन आवश्यक माहिती दिली गेली आहे. त्यातच यंदाच्या निवडणूक कामात लावलेल्या सुमारे २० हजार अधिकारी- कर्मचाऱ्यांना जीपीएसद्वारे जोडले गेले आहे.

त्यामुळे या सगळ्यांवर या तंत्रज्ञानाद्वारे लक्ष ठेवले जाणार असल्याचेही डॉ. इटनकर यांनी सांगितले. २० तारखेला निवडणूक असून मतदानानंतर सर्व ईव्हीएम व साहित्य सुरक्षीत ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणेच्या नजरेत ठेवले जाईल. २३ तारखेला मतमोजनीचीही सोय असल्याचे डॉ. इटनकर म्हणाले.

हेही वाचा…नागपुरात अंमली पदार्थांचे तस्कर व पिस्तूल वापणाऱ्यांचा सुळसुळाट! निवडणुकीच्या तोंडावर धामधूम

ईव्हीएममध्ये बिघाड झाल्यास १० मिनटांत चमू पोहणार

नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघातील निवडणूकीत काही ठिकाणा ईव्हीएम यंत्रात तांत्रिक बिघाडाच्या घटना घडल्या होत्या. त्याला दुरूस्तीला बराच वेळ लागल्याचा आरोप झाला होता. त्यावर जिल्हाधिकारी डॉ. इटनकर म्हणाले, यंदा ईव्हीएममध्ये बिघाडाची माहिती मिळताच १० मिनटांत तेथे चमू पोहचून दुरूस्तीचे काम सुरू होईल. त्यामुळे यंदा समस्या उद्भवणार नाही.

४० कोटींचा मुद्देमाल जप्त

नागपूर जिल्ह्यात यंदाच्या निवडणूक काळात सोने, चांदी, रेशन किट, रोख, मद्यासह इतर अशा सुमारे ४० कोटी रुपयांचा मुद्देमाल प्रशासनाकडून जप्त करण्यात आला आहे. मागील लोकसभा निवडणूकीच्या तुलनेत ही संख्या सुमारे ४०० पट असल्याचा दावाही जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी केला.

३.५० लाख मतदार वाढले

मागील लोकसभा निवडणूकीत अनेकांकडून मतदारयादीतून नाव गाळल्या गेल्याची तक्रार करण्यात आली होती. परंतु यंदा प्रशासनाकडून तीन वेळा यादी जाहिर केली गेली. त्यात जानेवारीपासून सुमारे ३.५० लाख नवीन मतदारांची नोंदणी झाली असून एकही नाव गाळल्याबाबतची तक्रार आली नसल्याचेही डॉ. इटनकर म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election campaign ends on november 19 after that strict action will take on election posts said dr itankar mnb 82 sud 02