लोकसत्ता टीम
वर्धा : गेल्या दोन दिवसात झालेला व आज सकाळपासून पावसाने हजेरी लावल्याने निवडणुकीचा प्राचार गार पडला आहे. त्यातच अनेक ठिकाणी गार पडल्याने प्रचार साहित्याचे नुकसान झाल्याचे ऐकायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात कडक उन्हान घामाने चिंब झालेले उमेदवार आता पावसात भिजत आहे. आज तर सकाळपासून पावसाची रिपरिप सूरू झाली. उमेदवार गाडीने निघत असला तरी कार्यकर्ते वेळेवर पोहचत नाही. घरातून निघणे शक्य नसल्याचे उत्तर मिळत असल्याने उमेदवाराचा खोळंबा होत असल्याचे पाहायला मिळते.
रस्ते नसलेल्या भागात प्रचार साहित्य नेणाऱ्या गाड्या जागेवरच आहे. रात्री एकाच गाडी गेली. आता गाड्या उभ्याचअसल्याचे उत्तर एका प्रचार प्रमुखाने दिले. काल धोडी सवंत मिळताच भाजपचे रामदास तडस यांनी नुकसानग्रस्त भागात भेट देऊन शेतीची पाहणी केली. ही संधी त्यांनी साधलीच. मात्र आता पदयात्रा घेण्यावर पावसामुळे बंधन आल्याने शहरी भागात एखाद्या घरीच बसून चर्चा करण्याचा पर्याय निवडल्याचे ते सांगतात.
आणखी वाचा-यवतमाळला भल्यापहाटे वादळी पावसाचा तडाखा; सखल भागात पाणी
अमर काळे याची शहरात रॅली नियोजन करणारे प्रवीण हिवरे सांगतात की पावसामुळे अडचण झाली आहे. लोकं येत नाही. पॉम्पलेट भिजतात. बँड वाजत नाही. चिन्ह असलेल्या तुतारीत पाणी शिरले की ती वाजत नाही. म्हणून पदयात्रा ऐवजी आज अन्य पर्याय शोधावे लागतील. पाऊस थांबण्याची वाट पाहणे आलेच. ग्रामीण भागात तर गार पडल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांचे बोल ऐकून घेण्याची आपत्ती आहे. मत कसे मागणार, ही समस्या निर्माण झाली आहे. गावातील मंडप भिजले असून गार पडल्याने फाटले पण आहे.