राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या अधिसभा आणि विद्या परिषदेच्या निवडणुकीमध्ये विद्यापीठ शिक्षकांमधून निवडून आलेल्या विजयी उमेदवारांनी प्रशासकीय इमारतीमध्ये आज बुधवारी चक्क मेजवानीचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला ‘लंच पार्टी’ असे नाव देण्यात आल्याने ही मेजवानी शैक्षणिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
विद्यापीठ शिक्षण मंचाने डॉ. बबनराव तायवाडे आणि ॲड. अभिजीत वंजारी यांच्या नेतृत्वातील महाआघाडीला अधिसभा निवडणुकीत धोबीपछाड दिली. पहिल्यांदाच शिक्षण मंचाने अधिसभेच्या प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन प्रवर्गातील २८ पैकी १५ जागांवर विजय मिळवला. महाआघाडीला ११ व ‘नुटा’ला दोन जागांवर समाधान मानावे लागले. यात अधिसभा, विद्या परिषदेत विद्यापीठ शिक्षकांच्या गटातून डॉ. ओमप्रकाश चिमनकर, डॉ. वर्षा धुर्वे, डॉ. प्रवीणा खोब्रागडे, डॉ. शालिनी लिहीतकर व डॉ. पायल ठवरे विजयी झाल्या. हे पाचही प्राध्यापक विद्यापीठाच्या विविध विभागांमधील आहेत.
हेही वाचा: नागपूर: सांताक्लॉज पावला, पुणे, मुंबईकरिता आता….
विद्यापीठातील शिक्षक असल्यामुळे त्यांनी बुधवारी प्रशासकीय इमारतीच्या परिसरात दुपारी १ ते ३ वाजता मेजवानीचे आयोजन केले आहे. विद्यापीठात याआधी झालेल्या निवडणुकीच्या विजयी उमेदवारांनी कधीही अशाप्रकारची मेजवानी दिलेली नाही. या प्रकाराने विद्यापीठात नवीच प्रथा सुरू होत आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.