वर्धा : विधान परिषदेच्या पाच आमदारांची विधानसभेवर निवड झाल्याने रिक्त झालेल्या या पाच जागांसाठी २७ मार्चला पोटनिवडणूक होत आहे. प्रत्येक जागेसाठी स्वतंत्र पोटनिवडणूक होत असल्याने पाचही जागा महायुतीस मिळण्याची खात्री दिल्या जाते. भाजप तीन, शिवसेना शिंदे व राष्ट्रवादी अजित पवार गटास प्रत्येकी एक जागा मिळू शकते. प्रवीण दटके, रमेश कराड, गोपीचंद पडाळकर, राजेश विटेकर व आमशा पाडवी हे विधानसभेवर निवडून गेले आहे. म्हणून ही पोटनिवडणूक असून १० ते १७ मार्च दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.
या जागांसाठी अनेक डोळा ठेवून बसले आहे. मात्र काहींची विधानसभा निवडणुकीत तिकीट कापण्यात आली होती. त्यात तत्कालीन आमदार दादाराव केचे यांचे नाव सर्वात पुढे होते. त्यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतल्यावर तर त्यांना थेट अमित शहा यांच्या दारी नेत विधानपरिषदेवर घेण्याची हमी मिळाली. त्यांना या घडामोडीबाबत विचारणा केल्यावर ते म्हणतात की होईल नं. अधिक भाष्य टाळले. आता मात्र आर्वी मतदारसंघात कार्यरत व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे खास विश्वासू अशी ओळख असलेले सुधीर दिवे यांचे नाव आक्रमकपणे पुढे करण्यात येत आहे. संत रविदास चर्मकार महामंडळाचे माजी अध्यक्ष व जिल्हा सचिव अशोक विजयकर यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटून आले. त्यांनी सुधीर दिवे यांच्या पक्षातील योगदानाचा पाढा वाचून त्यांना विधानपरेषदेची उमेदवारी देण्याची मागणी केली. त्यावर गडकरी यांनी बघतो म्हणत भाष्य टाळले.
हे जम्बो शिष्टमंडळ फार चर्चा नं झाल्याने थोडे हिरमुसले. दिवे यांच्यावर अन्यायच झाला. विधानसभा लढण्यापासून त्यांना वंचित ठेवण्यात आले. वर्धा जिल्ह्यातील सर्व निवडणुका, सभा, विविध कार्यक्रम त्यांनी एक पालक म्हणून यशस्वी केलेत. त्यांना संधी कां नको ? असा आमचा प्रश्न असल्याचे विजयकर म्हणाले. एक आणखी अडचणीची बाब आहे. दिवे यांच्यावर गडकरिंचा माणूस असा शिक्का आहे. गडकरी यांचा शब्द चालणार कां, यावर एका नेत्याने स्पष्ट केले की, गडकरी यांचा माणूस म्हणून नव्हे तर पक्षाचा निष्ठावंत व कार्यतत्पर नेता म्हणून दिवे यांना न्याय मिळावा. असे शिक्के लागल्याने डावलल्या जात असेल तर काम कसे करणार, असेही स्पष्ट सांगण्यात आले. केचे यांना उमेदवारी मिळण्याबाबत मात्र सर्व साशंक आहे. कारण बंडाचा झेंडा मागे घेतल्यावर केचे यांनी सुमित वानखेडे यांच्याविरोधात अनेकांना फूस लावल्याचा जाहीर आरोप झाला होता. त्याची आठवण आता बहुतांश भाजप नेते काढतात. म्हणून सुधीर दिवे यांचे नाव दमदारपणे रेटल्या जात आहे.