महागाईचा तडाखा, बाजारातील मंदी, न्यायालयाचे र्निबध या पाश्र्वभूमीवर शहरात आणि ग्रामीण भागात सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या ५०० वर असताना यापैकी मोजक्याच म्हणजे १९० ते २०० गणेश मंडळांनी त्यांच्या देखावे व रोषणाईसाठी महावितरण आणि एसएनडीएलकडून वीज पुरवठय़ासाठी अर्ज केले आहेत. एकीकडे वीज टंचाई असतानाच्या काळात दुसरीकडे उत्सवासाठी वापरली जाणारी वीज अधिकृत की अनधिकृत असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवाला लागणाऱ्या विजेसाठी मंडळांनी महावितरण किंवा एसएनडीएलकडून अधिकृतरीत्या वीज पुरवठा घेण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. वीज चोरी होऊ नये तसेच या माध्यमातून काही अपघात घडू नये हा त्या मागचा उद्देश होता. महावितरणने तर गणेशोत्सवासाठी सवलतीच्या दरात वीज देण्याची घोषणाच केली होती. मंडळांनी अर्ज करून तो घ्यायचा होता. प्रत्यक्षात चित्र फारसे आशादायी नाहीत. शहरात २५० ते ३०० तर ग्रामीणमध्येही तेवढेच गणेश मंडळे आहेत. महावितरणकडून शहरात काँग्रेस परिमंडळात तर एसएनडीएलकडून गांधीबाग, सिव्हील लाईन्ससह उर्वरित तीन परिमंडळांना वीज पुरवठा केला जातो. महावितरणकडे सिव्हील लाईन्स भागासाठी ८५ आणि बुटीबोरी भागातून ५ असे एकूण ९० अर्ज आल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले तर एसएनडीएलकडील तीन परिमंडळातून एकूण १०० पेक्षा अधिक अर्ज आल्याचे कंपनीच्या प्रसिद्धी प्रमुखांकडून सांगण्यात आले. म्हणजे दोन्ही कंपन्यांकडे एकूण १९० ते २०० मंडळांचेच अर्ज आल्याचे स्पष्ट होते.
काही गणेश मंडळांनी त्यांच्या देखाव्यांसाठी खासगी ठिकाणांहून वीज पुरवठय़ाची सोय केली आहे. मात्र छोटी-मोठी अशी अनेक मंडळे आहेत त्यांनी पारंपरिक ‘आकोडा’ पद्धतच अवलंबिली आहे. उत्सवाचा काळ असल्याने वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्या याबाबत अधिक गांभीर्याने लक्ष देत नाही. मात्र अशा माध्यमातून शॉर्टसर्किट किंवा इतर कारणांमुळे अपघाताचा धोका संभवतो. शहरात अशा प्रकारच्या घटना घडण्याचे यापूर्वीचे अनेक उदाहरणे आहेत. तरीही मंडळांकडून याबाबत काळजी घेतली जात नसल्याचे दिसून येते.
मंडप उभारणीच्या संदर्भात न्यायालयाने गणेश मंडळांवर काही र्निबध घातल्याने रस्त्याच्या मधोमध उभारण्यात येणाऱ्या मंडपांची संख्या कमी झाली असली तरी अनेक गणेश मंडळांच्या देखाव्यात रस्त्यालगतचे पदपथ वापरण्यात आले आहे. रोषणाईसाठी उभारण्यात आलेल्या कमांनीमुळे तसेच स्वागत व्दारामुळेही वाहतुकीला अडचण होत असल्याचे शहराच्या वर्दळीच्या भागात दिसून येते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा