लोकसत्ता टीम
अमरावती : मोर्शी तालुक्यातील दहसूर येथे एका शेताच्या कुंपणातील वीज प्रवाहाच्या संपर्कात आल्याने दोन महिलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना वर्षाच्या सरते शेवटी आज, ३१ डिसेंबर रोजी दुपारी घडली.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दहसूर येथील राजू मधुकर काकडे (३५) यांनी कपाशी व तुरीच्या पिकाचे नुकसान होऊ नये, वन्य प्राण्यांपासून संरक्षण मिळावे, यासाठी शेताच्या कुंपणात विद्युत प्रवाह जोडला होता. दरम्यान, आज त्याने कापूस वेचण्यासाठी महिला मजुरांना शेतात पाठवले. स्वतः फवारणीसाठी घाटलाडकी येथे कीटकनाशक औषध आणण्यासाठी निघून गेला. दरम्यान, दहसूर येथील रुखमाबाई विठ्ठलराव नावंगे ( ७०), मीराबाई फगणू परतेती (३७) या दोन महिला कापूस वेचण्यासाठी गेल्या असता सर्वप्रथम रुखमाबाई नावंगे यांना विजेचा धक्का लागून त्या जागीच कोसळल्या हे पाहून सोबत असलेली मीरा हिने गावाकडे धाव घेतली असता दुसऱ्या ठिकाणी तिलासुद्धा विजेचा धक्का बसल्याने त्या सुद्धा खाली कोसळल्या.
दरम्यान राजू काकडे यांची पत्नी पिण्याचे पाणी घेऊन शेतात गेली असता तिला रुखमाबाई मृतावस्थेत आढळल्याने तिने गावात येऊन आरडाओरड केली. गावातील लोकांनी लगेच घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता रुखमाबाई व मीरा मृतावस्थेत दिसून आल्या. याप्रकरणी मोर्शी पोलिसांनी शेतात वीज प्रवाह सोडणाऱ्या आरोपी राजू मधुकर काकडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.